>> मेघालयात त्रिशंकू स्थिती; ईशान्येकडील 3 राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालाचा अंदाज मतदानोत्तर चाचण्यांतून व्यक्त
ईशान्येतील तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया काल पूर्ण झाली. त्रिपुरामध्ये 16 फेब्रुवारीला, तर मेघालय-नागालँडमध्ये काल मतदान झाले. मतदानानंतर सोमवारी संध्याकाळी समोर आलेल्या मतदानोत्तर चाचण्यांतून त्रिपुरामध्ये भाजप युतीला बहुमताचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मेघालयात कोणालाही स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता नाही. दुसरीकडे नागालँडमध्ये भाजप युती पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काल मतदान संपल्यानंतर अनेक वृत्तवाहिन्या आणि संस्थांनी मतदानोत्तर चाचण्यांचे कल जाहीर केले.
पोल्स ऑफ पोल्स, टाईम्स नाऊ, जी न्यूज व मॅट्राईज, ॲक्सिस माय इंडिया, जन की बात, न्यूज18 व सी वोटर्स यांनी आपापल्या मतदानोत्तर चाचण्यांचे कल जाहीर केले. त्यानुसार बहुतांश वृत्तवाहिन्या आणि संस्थांनी त्रिपुरात भाजप युतीला 25 ते 40, सेक्युलर डेमोक्रेटिक फोर्स (एसडीएफ) पक्षाला 12 ते 21, टिप्रा मोठा पार्टी (टीएमपी) ला 12 ते 14 आणि इतरांना 1 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
मेघालयात नॅशनल पीपल्स पक्षाला (एनपीपी) 21 ते 24, काँग्रेसला 5 ते 9, भाजपला 6 ते 9, तृणमूल काँग्रेस पक्ष (टीएमसी) 8 ते 9 आणि इतर प्रादेशिक पक्ष अपक्षांना 18 ते 20 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
नागालँडमध्ये भाजप युतीला 40 ते 45, काँग्रेसला 1 ते 2, नागा पीपल्स फ्रंट (एनपीएफ) पक्षाला 3 ते 8 आणि इतरांना 6 ते 12 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मेघालयमध्ये 76.27 टक्के, तर नागालँडमध्ये 84.08 टक्के मतदान
मेघालय आणि नागालँडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली. दोन्ही राज्यात विधानसभेच्या 60 जागा आहेत; मात्र काल प्रत्येकी 59-59 जागांवर मतदान झाले. मेघालयमध्ये 76.27 टक्के, तर नागालँडमध्ये 84.08 टक्के एवढे मतदान झाले. मेघालयमध्ये शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली, तर नागालँडमध्ये काही मतदान केंद्रांवर दगडफेक आणि गोळीबार केल्याच्या घटना घडल्या. या दोन राज्यांसह त्रिपुरा विधानसभा निवडणुकीचा निकाल 2 मार्चला जाहीर होणार आहे. त्यात या तिन्ही राज्यांत कोण सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट होणार आहे.
दोन्ही राज्यांत काल सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. दोन्ही राज्यांतील 60 पैकी 59 जागांवर मतदान घेण्यात आले. नागालँडमध्ये 60 जागा आहेत, मात्र एका जागेवर काँग्रेस उमेदवाराने माघार घेतल्याने केवळ 59 जागांवर मतदान झाले. त्या जागेवर भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आला. अकुलुटो विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार खेकाशे सुमी यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर भाजपचे उमेदवार कजेतो किनिमी यांची बिनविरोध निवड झाली. मेघालयात यूडीपीचे उमेदवार एच. डी. आर. लिंगडोह यांच्या निधनानंतर सोह्योंग जागेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.
काल मतदान प्रक्रियेदरम्यान नागालँडमधील मोकोकचुंग जिल्ह्यातील उमाबस्ती भागातील अलोगाटाकी मतदान केंद्रावर दगडफेक करण्यात आली. परिणामी हिंसाचारामुळे मतदान थांबवण्यात आले. तसेच नागालँडमधील भंडारी मतदान केंद्रावर गोळीबार झाला, त्यात एनपीपीचा एक कार्यकर्ता जखमी झाला.
तीन राज्यांत पोटनिवडणुकीसाठी मतदान
या दोन राज्यांच्या निवडणुकांसह तीन राज्यांतील विधानसभेच्या 3 जागांवरील पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले. त्यामध्ये पश्चिम बंगालमधील सागरदिघी, झारखंडमधील रामगड आणि तामिळनाडूमधील इरोड मतदारसंघाचा समावेश होता. दरम्यान, अरुणाचल प्रदेशातील लुमला विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार सेरिंग ल्हामू यांनी बिनविरोध विजय मिळवला.