योगसाधना- 590, अंतरंगयोग- 175
- डॉ. सीताकांत घाणेकर
अध्यात्मशास्त्राप्रमाणे जीवन प्रत्येकाच्या संचिताप्रमाणे आहे, आणि म्हणून दर मानवाने आपल्या कर्मावर चिंतन केले पाहिजे. सूक्ष्म निरीक्षण करून शक्यतो जास्तीत जास्त सत्कर्म करायला हवे.
प्रत्येक व्यक्तीच्या मानवी जीवनाला वेगवेगळे रंग आहेत- सफेद, काळे, हिरवे, लाल, पिवळे… म्हणजेच विविध पैलू आहेत- यश/अपयश, सुख/दुःख, मान/अपमान, श्रीमंती/गरिबी… तसेच काहींना जीवन म्हणजे भगवंताची लिला वाटते, तर काहींना ती एक शर्यत वाटते; काहींना खेळ तर इतरांना शिक्षा… तर असे आहे आपले जीवन… अनेक तंतूंनी विणलेले…
शेवटी प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर ते अवलंबून आहे. पण अध्यात्मशास्त्राप्रमाणे जीवन प्रत्येकाच्या संचिताप्रमाणे आहे, आणि म्हणून दर मानवाने आपल्या कर्मावर चिंतन केले पाहिजे. सूक्ष्म निरीक्षण करून शक्यतो जास्तीत जास्त सत्कर्म करायला हवे.
कर्मसिद्धांताप्रमाणे आपली कर्मे प्रामुख्याने पुढीलप्रमाणे असतात-
- क्रियमाण ः जी आपण दर जन्मात करतो.
- संचित ः जे आपल्या दैवी खात्यात साठवले जाते.
- प्रारब्ध ः जे आपल्याला प्रत्येक जन्मात जिवंत अवस्थेत प्राप्त होते.
भारतीय ऋषी-महर्षींनी या गहन आणि अत्यावश्यक विषयावर सखोल अभ्यास केलेला आहे. ते म्हणतात ः
धनानि भूमौ पशवश्च गोष्ठे भार्या गृहद्वारि जनः श्मशाने।
देहश्चितायां परलोकमार्गे कर्मोनुगो गच्छति जीव एकः॥ - धन भूमीत, जनावरे गोठ्यात, धर्मपत्नी घराच्या दरवाजापर्यंत, लोक स्मशानापर्यंत, देह चितेपर्यंत… परलोक मार्गात जीव एकटाच जातो, आणि फक्त त्याचे कर्म त्याच्याबरोबर जाते.
हे तत्त्वज्ञान माहीत असल्यामुळे संत-महापुरुषांनी कर्माला पुष्कळ महत्त्व दिले आहे. त्यासाठी ‘कर्मयोग’ हा एक मार्ग भारतीय संस्कृतीमध्ये आहे. योगशास्त्रामध्ये इतर तीन मार्ग आहेत. ज्ञानयोग, भक्तीयोग, अष्टांगयोग यांबरोबरच कर्मयोग हा महत्त्वाचा मार्ग मानला जातो.
श्रीमद् भगवद्गीतेमध्येदेखील कर्मयोग हा 43 श्लोकांचा तिसरा अध्याय आहे. त्याशिवाय दुसरा सांख्ययोग, चौथा ज्ञानकर्म संन्यासयोग, पाचवा कर्म संन्यासयोग हेदेखील कर्माच्या संदर्भात मार्गदर्शक आहेत.
या विश्वात अनेक सत्ये सर्वांनी मान्य केलेली आहेत. त्यांतील काही अशी आहेत- - विजय शेवटी सत्याचाच होतो.
- जसे कराल, तसे भराल.
- जो जन्मला आहे, त्याचा मृत्यू अटळ आहे आणि तो ठरलेल्या वेळी होणारच.
बहुतेकजणांना हे सर्व ज्ञान आहे. कदाचित विस्तृत नसेल पण आवश्यक तेवढे नक्की आहे. तरीदेखील कित्येकजण पापकर्म सहज करतात. आपल्या वागण्याचे ते विविध तऱ्हेने समर्थन करतात.
एका ख्रिश्चन स्मशानभूमीत थडग्यावर लिहिले होते-
‘तू जसा आज आहेस, तसा मी होतो. मी जसा आज आहे, तसा तू होणार. म्हणून गर्व करू नकोस, अहंकार करू नकोस. सत्कर्म कर.’
खरेच, या थोड्याशा शब्दांत मानवी जीवनाचे महान तत्त्वज्ञान, सत्य सामावले आहे. म्हणून जिवंत असतानाच सत्कर्म करून प्रत्येक व्यक्ती आपले प्रारब्ध बदलू शकते.
एक तत्त्ववेत्ता म्हणतो- ‘प्रत्येक मानव स्वतःला पुढील जन्म कसा पाहिजे ते ठरवू शकतो.’ प्रत्येकाला दर जन्म हा सुख-शांती-समाधान-आनंद-समृद्धीचाच हवा असतो. पण त्याप्रमाणे कर्मदेखील करायला हवे. बहुतेकांना ही जाणीव जीवनाच्या अंतिम क्षणी होते.
माझ्या वैद्यकीय पेशामध्ये आम्ही क्षणोक्षणी विविध तऱ्हेचे मृत्यू बघतो. आम्ही शक्यतो रोग्याला वाचवायचा प्रयत्न अवश्य करतो, पण यश मिळेल की नाही याची खात्री नसते. काही मृत्यू अत्यंत हृदयद्रावक, दुःखदायक असतात. उदा. - छोट्या मुलाचा अथवा तरुणाचा मृत्यू.
- लहान मुले असलेल्या मातेचा मृत्यू.
- कुटुंबातील मुख्य व्यक्तीचा मृत्यू- जिच्यावर सर्व कुटुंब अवलंबून असते.
याला कारणे विविध असतात-
- रोग ः जन्मतःच असलेला, नंतर जडलेला.
- अपघात ः नैसर्गिक आपत्ती, भांडण, लढाया, आतंकवाद.
कुटुंबातील सर्व व्यक्ती डॉक्टरकडे आशेने बघतात. पण शेवटी डॉक्टरदेखील मानवच आहे. रोग्याला त्रास होऊ नयेत यासाठी आम्ही अनेक उपाय करू शकतो, पण मृत्यू टाळू शकत नाही.
मृत्यू जेव्हा समोर दिसतो तेव्हा अनेकांना आपल्या जीवनातील कर्माची (सत्कर्मे व दुष्कर्मे) आठवण होते. दुष्कर्माबद्दल पश्चात्ताप होतो, पण तेव्हा फार उशीर झालेला असतो. कळत-नकळत दुष्कर्म घडलेले असेल तर काहीवेळा भरपाई करू शकतो आणि ती करायला हवी. उदा. आर्थिक व्यवहार. तसेच जर कुणाला वाईट वागणूक दिली असेल- पती-पत्नी, सासू-सून, पालक-मुले, भावंडे किंवा इतर नातेवाईक, तर अशावेळी क्षमायाचना करून माफी मागू शकतो. दुसऱ्या व्यक्तीनेदेखील मोठ्या मनाने क्षमा करणे आवश्यक आहे.
असे म्हणणे सोपे आहे पण करणे फार कठीण. पण तसे केले तर विविध आत्म्यांबरोबर जो एकमेकाचा कर्माचा हिशेब आहे, त्यांच्यात आवश्यक फेरफार होऊ शकतो.
ज्यावेळी असे करणे शक्य असते त्यावेळी तसे अवश्य करावे. पण शक्य नसेल तर आपण सृष्टिरचेता भगवंताला मनापासून प्रामाणिकपणे शरण जाऊन त्याची माफी मागावी. भगवंत मातृहृदयी आहे, तो अवश्य या विषयात लक्ष घालून आवश्यक कृती करणार. पण आपला भाव व हेतू शुद्ध हवा. पश्चात्ताप खरा हवा. शरणागती संपूर्ण हवी.
मानव अज्ञानाने, अहंकारामुळे, विपरित ज्ञानामुळे कळत-नकळत अनेक चुका व पापकर्मे करतो हे माहीत आहे म्हणून आपल्या ऋषींनी छान प्रार्थना झोपतेवेळी म्हणण्यासाठी रचलेल्या आहेत.
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने।
प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः॥ - वसुदेवाचा पुत्र श्रीकृण भगवान. याला, सर्व दुःखे हरण करणाऱ्या परमात्म्याला, शरण आलेल्या लोकांचे क्लेश दूर करणाऱ्या गोविंदाला नमस्कार.
करचरण कृतं वाक्कायजं कर्मजं वा। श्रवणनयनजं वा मानसं वापराधं॥
विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व। जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो॥ - हात, पाय, वाणी, शरीर कर्म, कान, नाक, डोळे, मन यांच्याद्वारे कळत-नकळत जे योग्य-अयोग्य अपराध मी केले असतील, त्या सर्व अपराधांसाठी हे करुणासागरा, महादेवा, तुम्ही मला क्षमा करा. तुमचा जयजयकार असो.
- भगवंत सर्वज्ञानी आहे, म्हणून आपण असे फक्त म्हणून चालत नाही तर परत तशी कर्मे आपण करू नयेत हाच या प्रार्थनेचा हेतू आहे.