गोव्यासह कोकणात उष्णतेच्या लाटेची शक्यता

0
14

>> आजपासून पुढील काही दिवसांत तापमान वाढणार; नागरिकांना सतर्कतेच्या सूचना; पारा 37 ते 39 अंशांपर्यंत जाणार

राज्यातील थंडीचा कडाका गेल्या काही दिवसांपासून कमी झाला असून, तापमानात वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून आग ओकणाऱ्या सूर्याने कडक उन्हाळ्याची जाणीव करून दिली होतीच, त्यात काल गोवा व महाराष्ट्राच्या हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. मंगळवारपासून पुढील काही दिवसांत गोव्यासह कोकण किनारपट्टीमध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या काळात तापमान 37 ते 39 अंशांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. विशेषतः सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

राज्यात मागील आठवड्यात पणजी शहरात सोमवारी 37.9 आणि गुरुवारी 38.2 अंश सेल्सिअस अशा उच्चांकी तापमानाची नोंद झाली होती. मागील आठवड्यापासूनच सूर्य आग ओकू लागल्याने उन्हाच्या झळा अधिक तीव्र होत जाणार याची जाणीव झाली होती.

फेब्रुवारी हा वसंत ऋतूचा महिना आहे. यावेळी वसंत ऋतू पूर्णपणे गायब आहे. गोव्यासह देशाच्या बहुतांश भागात थंडीनंतर थेट उष्मा जाणवू लागला आहे. राज्यात फेब्रुवारी महिन्यातच तापमानात वाढ होऊ लागली असून, सध्या राज्यात तापमान 35 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने लोकांना उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागत आहे. आगामी काही दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली असून, हे तापमान 38 अंश सेल्सिअसपेक्षा वर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

येत्या काही दिवसांत गोव्यासह संपूर्ण कोकण भागात उष्णतेच्या तीव्र लाटेचा सामना करावा लागणार असल्याचे काल हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर गोमंतकीय जनतेने दुपारच्या वेळी आणि संध्याकाळी देखील शक्यतो उन्हात जाणे टाळावे, अशी सूचना हवामान खात्याने
केली आहे.

काय धोका संभवतो?
उन्हात फिरल्याने चक्कर येणे, रक्तदाब वाढणे, छातीत धडधडल्यासारखे होणे, घाम जास्त गेल्याने शरीरात पाण्याची कमतरता होणे आदी समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन राज्याच्या हवामान खात्याने केले आहे.

हळूहळू तापमान घटणार
गोव्यासह कोकणात दोन-तीन दिवसांत तापमानाचा पारा 37 ते 39 अंशादरम्यान जाईल. त्यानंतरच्या पुढील तीन दिवसांनंतर कमाल तापमानात 2 ते 3 अंशांची घट जाणवू शकेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे काही प्रमाणात उन्हाच्या चटक्यांपासून सुटका होण्याची शक्यता आहे.

काळजी काय घ्याल?
घरातून बाहेर पडताना सुती कपडे परिधान करावेत, डोळ्यांवर चष्मा लावावा, डोक्याला टोपी किंवा स्कार्फ बांधावा, आहारात काकडी, लिंबू, कलिंगड, कोकम सरब यांचा समावेश करावा, अशी सूचनाही हवामान खात्याने केली आहे. तसेच जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

कोकणातच अधिक प्रभाव
कोकणात उष्णतेच्या लाटेचा अधिक प्रभाव असेल; मात्र महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांना मात्र उष्णतेच्या लाटेचा फटका बसणार नाही, असे प्रादेशिक हवामान विभागाने म्हटले आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा अधिक त्रास होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई, रायगड या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे.