- श्रीरंग व्यंकटेश जांभळे
स्वस्त वाहतूक, कमी प्रदूषण या जलमार्गाच्या जमेच्या बाजू आहेत. परंतु नाशवंत माल, तुलनेने कमी प्रमाणात माल निर्यात करण्यासाठी, अल्प वेळात गंतव्य स्थानी माल पोचवण्यासाठी हवाईमार्गाची उपयुक्तता वादातीत आहे. काळाच्या ओघात उद्योग जगतातील हा मार्ग प्रशस्त होणार आहे. आपण त्यासाठी सज्ज होऊन आपली क्षमता सिद्ध करणे आपल्याच हाती आहे. आपल्या हातून ते निसटून जाऊ नये यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी.
गोवा हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील सर्वात लहान व लोकसंख्येच्या दृष्टीने खालून चौथा क्रमांक असलेले राज्य आहे. पर्यटन व खनिज व्यवसायामुळे जागतिक पटलावर परिचित असलेले हे राज्य आता मोपा विमानतळामुळे आणखी चर्चेत आले आहे. रस्ते वाहतूक, जलमार्ग, रेलमार्ग व हवाईमार्ग अशा चारही वाहतुकीच्या मार्गांची उपलब्धता गोव्यासाठी फार मोठी जमेची बाजू आहे. सर्वप्रकारच्या व्यावसायिकांसाठी ही महत्त्वाची उपलब्धी असून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मोपा विमानतळामुळे व्यवसायवृद्धीसाठी गोवा हे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून पुढे येणार आहे. गोव्याशेजारील कर्नाटक, महाराष्ट्र यांसोबत अन्य काही राज्यांतून मोपा विमानतळावरून निर्यातक्षम व्यापार करण्यासाठी बरेच व्यापारी पुढे येतील. जागतिक स्तरावरील सद्यस्थितीचा आढावा घेता, कृषिमालाच्या निर्यातीला बरीच तेजी येणार आहे.
राष्ट्रीय बागवानी मंडळाने (नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड) 2020-21 मध्ये प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार 9.6 मिलियन हेक्टर जमिनीवर फळलागवड असून 102.48 मिलियन मेट्रिक टन उत्पादन होते. तसेच 10.86 मिलियन हेक्टर भूभागावर भाजीपाला लागवड केली जाते व त्यातून वार्षिक उत्पादन 200.45 मिलियन मेट्रिक टन एवढे मिळाले आहे. अन्न व कृषी संघटन (एफएओ) या जागतिक संस्थेच्या 2020 मध्ये प्रकाशित आकडेवारीनुसार आले व भेंडी या पिकांचे उत्पादन करणारा भारत हा सर्वात आघाडीचा देश आहे. तसेच बटाटा, कांदा, फ्लावर, कोबी, वांगी यांच्या उत्पादनात जागतिक क्रमवारीत भारत दुसऱ्या स्थानावर आहे. फळांच्या बाबतीतही केळी (26.29 टक्के), पपई (43.26 टक्के) आणि आंबा (45.14 टक्के) यांच्या उत्पादनात भारताचे स्थान क्रमांक एकचे आहे. अशा प्रकारच्या मूबलक उत्पादनांमुळे भारताला निर्यातीच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत. सन 2021-22 मध्ये भारतातून रु. 11,412.50 कोटी किमतीची फळे व भाजीपाला निर्यात केला गेला. तसेच रु. 12,858.66 कोटी किमतीचा प्रक्रिया केलेला कृषिमाल (कडधान्य, फळे व भाजीपाला) निर्यात केला गेला.
भारतातून ताजी फळे व भाजीपाला यांची निर्यात बांगलादेश, नेपाळ, नेदरलँड, मलेशिया, श्रीलंका, इंग्लंड, ओमान, कतार या देशांत मोठ्या प्रमाणावर होते. कृषी प्रक्रिया मालाची निर्यात अमेरिका, अमिरात, चीन, नेदरलँड, इंग्लंड, साऊदी अरब या देशांत मोठ्या प्रमाणात होते. हे सारे असूनही जागतिक बाजारातील भारताचा वाटा 1 टक्का एवढाच आहे.
सर्वप्रकारच्या निर्यातीचा विचार करता देशपातळीवर गोवा 16 व्या स्थानावर आहे. सन 2020-21 मध्ये गोव्यातून 17,095 कोटी रुपये किमतीची निर्यात झाली. यातील 60 टक्के वाटा औषधी उत्पादनांचा आहे. एप्रिल ते जून 2022 या तिमाहीत गोव्यातून कृषिमालाची निर्यात 13.9 कोटी रुपये किमतीची झाली. सन 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत हाच आकडा 27.4 कोटी रुपये इतका होता. या कालावधीत देशभरात निर्यातीसंबंधी असाच कल दिसून आला होता. गोव्यातून होणाऱ्या कृषिमाल निर्यातीत ताजी फळे व भाजीपाला, काजू, मद्यार्क, प्रक्रिया केलेली फळे व भाजीपाला, रस, गूळ, कन्फेक्शनरी यांचा वाटा आहे. यातील मद्यार्काचा वाटा 50 टक्के एवढा आहे. ताजी फळे व भाजीपाला हा शेजारील राज्यांतून आणून निर्यात केला जातो.
गोव्यात हल्लीच कृषिमाल निर्यात धोरण राज्य सरकारने जाहीर केले. या धोरणाद्वारे सरकारने काही उद्दिष्टे निर्धारित केली आहेत. गोव्याला देशातील महत्त्वाचे कृषी निर्यात केंद्र बनविणे; नावीन्यपूर्ण, स्वदेशी, पारंपरिक व अपारंपरिक कृषी उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देणे; कृषी निर्यातीच्या क्षेत्रात उद्योजकता विकास; कृषी निर्यात क्षेत्राशी संबंधित भागधारकांचा कौशल्य विकास ही त्यातील काही उद्दिष्टे. मोपा येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाच्या आधारे कार्गो वाहतुकीला चालना देऊन या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी सरकारचे प्रयत्न चालू असल्याचे सरकारच्या प्रतिनिधींनी जाहीर केले आहे. ताजी फळे व भाजीपाला हवाईमार्गाने निर्यात करण्यासाठी पॅकिंगच्या सुविधा उभ्या करणे व एकूणच लॉजिस्टिक क्षेत्र मजबूत करणे यासाठी जीएमआर कंपनीकडे प्रस्ताव दिल्याचे राज्याच्या कृषिमंत्र्यांनी जाहीर केले आहे. पॅकिंगच्या प्रमाणित सुविधा व आवश्यक प्रयोगशाळा उभ्या करणे ताजी फळे व भाजीपाल्याच्या निर्यातीसाठी आवश्यक आहेत. शीतश्रृंखला (कोल्ड चेन) उभारणे, नाशवंत शेतीमालासाठी विशेष कार्गोसेवा याही गोष्टी आवश्यक आहेत. शेतमालाच्या काढणीपश्चात हाताळणीच्या योग्य सुविधा व त्यासाठी आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ यांचे या उद्योगात अनन्यसाधारण योगदान आहे.
आतापर्यंत जो काही शेतमाल निर्यात झाला तो जलमार्गाने झाला आहे. वेर्णा येथील चँगोवर ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून गोवा हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशनने भाजीपाला नेदरलँडला निर्यात करण्याचा एक प्रयोग केला आहे. गोव्यातील भेंडी, पपई, बिंबल ही उत्पादने निर्यात केली गेली. खोतीगाव- काणकोण येथील प्रगतशील आणि पुरस्कारप्राप्त शेतकरी श्री. प्रसाद वेळीप यांनी चार वर्षांपूर्वी निर्यातीसाठी टॅपिओका या कंदवर्गीय पिकाचे अडीच हेक्टरवर उत्पादन घेतले. रानडुकरांच्या प्रादुर्भावानंतरही सुमारे 24 टन कंद उत्पादन त्यांना मिळाले. परंतु अपेक्षित दर न मिळाल्याने त्यांनी हा प्रयोग थांबवला. सध्या गोव्यातून निर्यात होणारा हा भाजीपाला गोठवलेल्या (फ्रोझन) स्वरूपात पाठवला जातो. त्यामुळे याचा खर्च वाढतो. दक्षिणेतील राज्यांतून गोव्यात आणून बराचसा टॅपिओका निर्यात केला जातो.
राज्याच्या कृषी निर्यात धोरणानुसार मानकुराद आंबा, मयडेची केळी, अळसांदे, करगुट जातीचे तांदूळ अशी गोव्यातील वैशिष्ट्यपूर्ण कृषी उत्पादने निर्यात करण्याचा सरकारचा मानस आहे. कृषिमाल निर्यातीसाठी अन्यही काही पिकांचा विचार करता येईल. खनिज उत्खननावरील बंदीनंतर गोव्यातून निर्यातीचे प्रमाण तीव्रतेने घटले. त्यावेळी व्यापार व उद्योग जगतातील धुरिणांनी औषधी उत्पादने, जहाज बांधणी, सॉफ्टवेअर, कृषिमाल या क्षेत्रांतील निर्यातीकडे आश्वासकपणे अंगुलिनिर्देश केला होता. काजू, कोकम, फणस, जैविक पद्धतीने उत्पादित केलेला शेतमाल यांचा त्यात उल्लेख होता. भारतीय निर्यातदार संघटना व राज्य सरकारच्या उद्योग व व्यापारविषयक खात्याने निर्यात धोरणासंबंधी तयार केलेल्या एका अहवालात निर्यातदारांच्या प्रश्नांवर प्रकाश टाकला आहे. लॉजिस्टिकसंबंधी साधनसुविधांवर त्यात भर दिला आहे. गोव्यातील कृषिमालाच्या निर्यातीसाठी सुयोग्य व्यूहरचना आवश्यक असल्याचे त्यात म्हटले आहे. कोकमच्या औषधी गुणांमुळे त्याला खूप मागणी व परदेशात निर्यात करण्यासाठी वाव आहे. परंतु त्याचे उत्पादन सघन लागवडीच्या अभावी विखुरलेले आहे. ऑर्किड व अँथुरियम ही निर्यातक्षम फुले; भेंडी, गवार, हिरवी मिर्ची, फणस यांसारखी उत्पादने निर्यातीसाठी फार उपयुक्त आहेत. परंतु यांचे उत्पादन, काढणीपश्चात हाताळणी यासाठी सुयोग्य व्यूहरचना आवश्यक आहे.
या सगळ्यात प्रशिक्षित मनुष्यबळ ही अत्यावश्यक गोष्ट आहे. राज्यात व्यावसायिक शिक्षण व कृषी विकास याबाबत निश्चित धोरण नसल्याने मूबलक साधने असूनही आपण क्षमतांचा उपयोग करण्यास कमी पडतो आहोत. कृषी उत्पादन, काढणीपश्चात प्रक्रिया, साठवणूक, मार्केटिंग व आता निर्यात यासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी कौशल्यांवर आधारीत अभ्यासक्रम (डिप्लोमा, डिग्री) तरुण पिढीला उपलब्ध करून दिले पाहिजेत. उद्योजकता विकास याविषयी योग्य मार्गदर्शन व उपक्रम राबवले पाहिजेत. नवीन ‘स्टार्ट-अप्’साठी पोषक वातावरण निर्मितीची गरज आहे. प्रमाणीकरण, निर्यातक्षम मालासाठी आवश्यक गुणवत्ता राखण्याच्या व्यवस्था यांमध्ये मनुष्यबळाची मागणी झपाट्याने वाढते आहे. या सर्व उभरत्या परिस्थितीला योग्य क्षमतेने सामोरे गेल्यास गोवेकरांसाठी मोपाचा विमानतळ सोनेरी संधी ठरू शकतो. रोजगाराविषयी गंभीर चिंता व्यक्त करणाऱ्या समाजाला चांगली इकॉसिस्टिम तयार करून देण्यासाठी सर्व संबंधितांनी आपापल्या पातळीवर आपले संपूर्ण क्षमतेने योगदान दिल्यास हे वरदान आपल्या झोळीत घेऊ शकतो. स्वस्त वाहतूक, कमी प्रदूषण या जलमार्गाच्या जमेच्या बाजू आहेत. परंतु नाशवंत माल, तुलनेने कमी प्रमाणात माल निर्यात करण्यासाठी, अल्प वेळात गंतव्य स्थानी माल पोचवण्यासाठी हवाईमार्गाची उपयुक्तता वादातीत आहे. काळाच्या ओघात उद्योग जगतातील हा मार्ग प्रशस्त होणार आहे. आपण त्यासाठी सज्ज होऊन आपली क्षमता सिद्ध करणे आपल्याच हाती आहे. आपल्या हातून ते निसटून जाऊ नये यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी.