तीन राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका जाहीर

0
8

>> त्रिपुरामध्ये 16, तर नागालँड, मेघालयमध्ये 27 फेब्रुवारीला मतदान

हिमाचल प्रदेश आणि गुजरात राज्यांमधील निवडणुका संपल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने काल ईशान्य भारतातील तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर केली. त्रिपुरा, नागालँड, मेघालय या राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार त्रिपुरा राज्यात येत्या 16 फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणूक घेतली जाणार आहे, तर 27 फेब्रुवारी रोजी नागालँड आणि मेघालयमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडेल. या तिन्ही राज्यांच्या निवडणुकीचा निकाल 2 मार्च रोजी जाहीर करण्यात येईल.
नागालँड विधानसभेचा कार्यकाळ 12 मार्च, मेघालय विधानसभेचा कार्यकाळ 15 मार्च आणि त्रिपुरा विधानसभेचा कार्यकाळ 22 मार्च रोजी संपणार आहे. 2018 साली या तिनही राज्यात दोन टप्प्यात मतदान झाले होते.

नागालँड आणि मेघालय या दोन राज्यांमध्ये एकत्रच निवडणूक घेण्यात येईल. या निवडणुकीसाठी अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 7 फेब्रवारी आहे, तर 8 फेब्रुवारीपर्यंत अर्जांची छननी केली जाईल. 10 फेब्रुवारी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल. या दोन राज्यांमध्ये येत्या 27 फेब्रुवारी रोजी निवडणूक होईल, तर 2 मार्च रोजी मतमोजणी होईल.
त्रिपुरा राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 21 जानेवारी रोजी अधिसूचना जारी करण्यात येईल. उमेदवारांना 30 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज करता येईल. 31 जानेवारी रोजी अर्जांची छाननी केली जाईल. 2 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. 16 फेब्रुवारी रोजी येथे मतदान होईल, तर 2 मार्च रोजी मतमोजणीला
केली जाईल.

मागच्या निवडणुकीत भाजपने त्रिपुरामध्ये ऐतिहासिक असा विजय मिळवला होता. राज्यातील 25 वर्षांपासूनची डाव्या आघाडीची सत्ता त्यांनी उलथवून टाकली होती. भाजपने 2018 साली 35 जागा जिंकल्या होत्या. त्यांनी स्वदेशी पिपल्स फ्रंट ऑफ त्रिपुराच्या मदतीने 59 पैकी 43 जागा जिंकल्या होत्या. बिप्लब देब यांच्याकडे सुरुवातीला मुख्यमंत्रिपद देण्यात आले होते. नंतर 2022 साली देब यांच्या जागी माणिक शॉ यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले.

मेघालय राज्यात 2018 साली मेघालयमध्ये नॅशनल पिपल्स पार्टी आणि भाजपने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली होती. निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक 21 जागा जिंकल्या होत्या; पण भाजपने अन्य पक्षांना एकत्र करून सत्ता स्थापन केली. एनपीपीचे कोनराड संगमा हे सध्या मेघालयचे मुख्यमंत्री आहेत.
नागालँड राज्यात एनडीपीपी पक्ष आणि भाजपने 2018 साली सरकार स्थापन केले होते. एनडीपीपीने 18, तर भाजपने 12 जागा जिंकल्या होत्या. सध्या नेफ्यू रियो हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत

कोणत्या राज्यात किती जागा
त्रिपुरा : एकूण जागा – 60, बहुमताचे संख्याबळ – 31
मेघालय : एकूण जागा- 60, बहुमताचे संख्याबळ – 31
नागालँड : एकूण जागा- 60, बहुमताचे संख्याबळ – 31