सावंत, पर्रीकरांकडून विश्‍वासघात ः गिरीश

0
12

म्हादईप्रश्नी कर्नाटक राज्यातील सर्व राजकीय नेते हे सदैव प्रामाणिक राहिले. उलट गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्याचा विश्वासघात केल्याचा आरोप काल गोवा प्रदेश कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला.

कॉंग्रेसवर आरोप करणार्‍या प्रमोद सावंत यांनी मागील घटना क्रमांवर एक नजर टाकावी असे सांगून कॉंग्रेसने १९८० सालापासून सातत्याने म्हादईचे पाणी वळवण्यास कर्नाटकला विरोध केल्याचे चोडणकर यांनी स्पष्ट केले.

माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या सरकारपासून त्यानंतर सत्तेवर आलेले गोव्यातील एकही कॉंग्रेस सरकार म्हादईप्रश्नी कर्नाटकच्या दबावाला बळी पडले नाही. दोन्हीकडे कॉंग्रेसची सरकारे असूनही गोव्यातील कॉंग्रेस सरकारने संघर्ष केला होता असे चोडणकर म्हणाले.

आम्ही कळसा-भंडुरा प्रकल्पाला भेट दिल्यानंतर कर्नाटकने म्हादईचे पाणी वळवल्याचे सावंत सरकारला सांगितले होते. मात्र त्यावेळी त्यांनी ही गोष्ट मान्य केली नव्हती. मात्र आता तीच बाब मान्य करत आहेत. त्यामुळे गोव्यातील जनतेने त्यांच्यावर कसा विश्वास ठेवावा, असा प्रश्न चोडणकर यांनी केला आहे. या गंभीर विषयावर खोटारडेपणा करणार्‍या प्रमोद सावंत यांनी राजीनामा देण्याची मागणी यावेळी चोडणकर यांनी केली.