>> नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज्यात अनेक अपघात
राज्यातील विविध भागात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अनेक वाहन अपघातांची नोंद झाली असून गुड्डेमळ – सावर्डे येथे कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकी चालकाचे जागीच निधन झाले.
नववर्षात राज्यात वाहन अपघात सत्र सुरूच आहे. काल संध्याकाळी गुड्डेमळ सावर्डे येथे कारगाडी आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालक श्यामसुंदर तेंडुलकर (६० वर्षे, निरंकाल) याचे जागीच निधन झाले, अशी माहिती कुडचडे पोलिसांनी दिली.
झुआरी पुलावर कारची कठड्याला धडक
आगशी येथे झुआरी पुलाला जोडणार्या उड्डाण पुलावर एका कारगाडीच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कारगाडीने संरक्षक कठड्याला धडक दिली. या अपघातात कारगाडीतील तिघेजण जखमी झाले. कारगाडीच्या चालकाला झोप आल्याने हा अपघात झाला, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
खोर्ली मळार येथे अपघात
पणजी ते फोंडा महामार्गावर खोर्ली – मळार येथे दोन चारचाकी वाहनांमध्ये अपघात झाला. या अपघातात दोन वाहनातील सहाजण जखमी झाले असून त्यातील तिघांना बांबोळी येथील सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आले आहेत.
जुने गोवे पोलिसांनी पंचनामा केला. तसेच, वेर्णा येथे कारगाड्यांमध्ये अपघात झाल्याची नोंद झाली आहे.