>> थकित बिल न भरल्यास नळजोडणी तोडणार : काब्राल
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी बिलाच्या सुमारे ९२.१५ कोटी रुपयांच्या थकबाकीची वसुली करण्यासाठी एकरकमी परतफेड योजना (ओटीएस) एका महिन्यासाठी कार्यान्वित करण्यात आली आहे. या एका महिन्यात ओटीएस योजनेंतर्गत थकित बिल न भरणार्या ग्राहकांची नळजोडणी तोडण्यात येणार आहे, असा इशारा सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी ओटीएस योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलताना काल दिला.
पाणीपुरवठा खात्याच्या पाणी बिलांच्या थकबाकीच्या वसुलीसाठी दुसर्यांदा ओटीएस योजना कार्यान्वित केली जात आहे. ही ओटीएस योजना १ जानेवारी ते ३१ जानेवारीपर्यंत ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी आणखीन मुदतवाढ दिली जाणार नाही. थकबाकी न भरणार्यांची नळजोडणी थेट तोडली जातील, असे मंत्री काब्राल यांनी स्पष्ट केले.
पाणी बिलाची सुमारे ९२.१५ कोटीची एकूण थकबाकी असली, तरी त्यात पाणी बिलाची मूळ रक्कम केवळ ३२ कोटी रुपये एवढी आहे. ही रक्कम वसूल करण्यासाठी थकबाकीदार ग्राहकांशी संपर्क साधण्यात येणार आहे, असेही काब्राल यांनी सांगितले.
या ओटीस योजनेसाठी घरगुती जोडणीसाठी पाचशे रुपये शुल्क आणि व्यावसायिक जोडणीसाठी १ हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे. थकबाकीदार ग्राहकाने ऑनलाइन पद्धतीने वेबसाइटवर लॉगइन केल्यानंतर त्याला थकबाकीबाबत सविस्तर माहिती प्राप्त होणार आहे. त्यानंतर ग्राहक थकबाकी भरण्यासाठी पर्याय निवडू शकतो. एकापेक्षा जास्त पर्याय निवडून निश्चित केलेल्या दिवशी पैशांचा भरणा न केल्यास थकबाकीदार ओटीएससाठी अपात्र ठरणार आहे.
एका हप्त्यात थकित बिल भरल्यास व्याज माफ
पाणी बिलाची थकबाकी एका हप्त्यात भरणार्या ग्राहकाला बिलावरील व्याज १०० टक्के माफ केले जाणार आहे. दोन हप्त्यांत बिलाची रक्कम भरणार्याला ८० टक्के व्याज माफ केले जाणार आहे. या योजनेखाली जास्तीत जास्त दहा हप्त्यांमध्ये बिलाची रक्कम भरण्याची तरतूद आहे. दहा हप्त्यांमध्ये थकबाकी भरणार्या व्याजामध्ये सूट दिली जाणार नाही. न्यायालयात पाण्याबाबत खटले प्रलंबित असलेले ग्राहक सुध्दा या ओटीएस योजनेचा लाभ घेऊ शकतात, असे नीलेश काब्राल यांनी सांगितले.