ध्वनी प्रदूषण केल्याच्या मुद्यावरून काल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सनबर्न महोत्सवाचे आयोजक आणि राज्य सरकारला धारेवर धरले. सनबर्न महोत्सवावेळी ५५ डेसिबल्सपर्यंत संगीत वाजवण्यास परवानगी असताना त्यापेक्षा मोठ्या आवाजात संगीत वाजवून ध्वनी प्रदूषण केल्या प्रकरणी सनबर्नविरोधात तातडीने जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. काल झालेल्या सुनावणीवेळी गोवा खंडपीठाने सनबर्नच्या आयोजकांसह सरकारी यंत्रणा व हणजूण पोलिसांना चांगलेच धारेवर धरले. कर्णकर्कश आवाजात संगीत वाजवून लोकांना त्रास दिल्या प्रकरणी खंडपीठाने आयोजकांचे कान उपटले.
महोत्सवादरम्यान संगीत ध्वनीची डेसिबल मीटरने मोजमाप न केल्याबद्दल खंडपीठाने संताप व्यक्त केला. संगीताच्या ध्वनीची मर्यादा, तसेच महोत्सवासाठी देण्यात आलेली परवानगी याची माहिती प्रवेशद्वाराच्या फलकावर लावण्याचा आदेशही खंडपीठाने दिला. त्यानंतर न्यायमूर्ती वाल्मिकी मिनेझिस यांनी या प्रकरणाची सुनावणी ३ जानेवारीपर्यंत तहकूब केली.