निसर्गसंपन्न गोव्याला प्रदूषणमुक्त ठेवा

0
15

>> केंद्रीय महामार्ग व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन; नव्या झुआरी पुलाच्या एका चौपदरी भागाचे दिमाखात उद्घाटन

गोवा राज्य पर्यटनासाठी जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे. येथील हे निसर्ग सौंदर्य कायम राखण्यासाठी गोवा राज्य जल, वायू आणि ध्वनी प्रदूषणमुक्त ठेवण्यावर भर द्यावा. गोव्यात महामार्गाच्या बाजूला झाडांची लागवड करा. तसेच राज्य प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी इलेक्ट्रिक, इथेनॉल आदी नवीन इंधनआधारित वाहनांच्या वापरावर भर द्यावा, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी काल केले. नव्या झुआरी पुलाच्या एका चौपदरी भागाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

झुआरी नदीवरील नव्या पुलाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते काल संध्याकाळी मोठ्या दिमाखात उद्घाटन पार पडले. त्यानंतर मध्यरात्रीपासून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, सभापती रमेश तवडकर, मंत्री सुदिन ढवळीकर, मंत्री माविन गुदिन्हो, मंत्री गोविंद गावडे, मंत्री रोहन खंवटे, आमदार विरेश बोरकर, आमदार आंन्तोन वाझ व इतरांची उपस्थिती होती.
झुआरी पूल हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या पुलाचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. एका चौपदरी भागाचे बांधकाम पूर्ण झाल्याने वाढती वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी जनतेसाठी खुला केला जात आहे. या झुआरी पुलाचे भूमिपूजन माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. त्यावेळी सुदिन ढवळीकर हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते, असेही गडकरी यांनी आवर्जून नमूद केले.

झुआरी पूल हा दक्षिण आणि उत्तर गोव्याला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. कोविड महामारीमुळे या पुलाच्या कामात अडचणी निर्माण झाल्याने बांधकामाला विलंब झाला. या पुलावरील नियोजित फिरते रेस्टॉरंट आणि दर्शक गॅलरी बांधण्यासाठी निधी उपलब्धतेबाबत योग्य तोडगा काढण्यात येणार आहे. मुंबई येथील वरळी येथील सी-लिंकवर दर्शक गॅलरीचे स्वप्न साकारू शकले नाही. तथापि, झुआरी नदीवरील पुलावर फिरते रेस्टॉरंट आणि दर्शक गॅलरीचे स्वप्न निश्‍चितपणे साकारले जाणार आहे. ही गॅलरी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण बनेल, असेही गडकरी म्हणाले.

केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्यातून झुआरी पुलावरील फिरत्या रेस्टॉरंटची संकल्पना निश्‍चितपणे पूर्ण होणार आहे. नागपूर येथे म्युझिकल फाऊंटन लाइट आणि साऊंड शोच्या माध्यमातून आकर्षक सजावट करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर झुआरी पुलावर आकर्षक सजावट करण्यासाठी सहकार्य करावे. गोव्यात येणार्‍या पर्यटकांसाठी हा पूल विशेष आकर्षण ठरणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री गडकरी नेहमी नवीन संकल्पना मांडतात आणि खर्‍या करून दाखवितात. गोव्यात पत्रादेवी ते पोळे या महामार्गासाठी योगदान दिले आहे. राज्यातील विविध भागांतील महामार्गांच्या विकासासाठी सुमारे ३५०० हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यासाठी गडकरी यांच्याकडून सहकार्य मिळणार आहे. पर्वरी येथील महामार्ग, बोरी पूल, काणकोण, नावेली, खांडेपार पूल, मडगाव या भागातील महामार्गांच्या कामांसाठी सहकार्य मिळत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, पुलाचे बांधकाम करताना दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या जीव गमावलेल्या तीन कर्मचार्‍यांच्या कुटुंबांसाठी प्रत्येकी २ लाख रुपयांच्या आर्थिक साहाय्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
या पुलाचा दुसरा चौपदरी भाग आगामी सात ते आठ महिन्यांत वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे नीलेश काब्राल यांनी सांगितले. या आकर्षक केबल स्टेड पुलावरील टॉवर पीपीपी पद्धतीने उभारण्यात यश प्राप्त झालेले नाही. या पुलावरील फिरता टॉवर उभारण्यासाठी गडकरींनी साहाय्य करावे, असे विनंती काब्राल यांनी केली.

३० हजार कोटी खर्चून महामार्गांची बांधकामे
केंद्रीय महामार्ग मंत्रालयाकडून गोव्यासह देशपातळीवर महामार्ग विकासाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गोव्यात महामार्ग बांधकामासाठी २५ ते ३० हजार कोटींची कामे हाती घेतली आहेत. त्यातील अनेक कामे पूर्ण झाली आहेत, तर काही कामे सुरू आहेत. बंदर दळणवळण वाढविण्यासाठी १२ हजार कोटींची कामे हाती घेण्यात आली आहेत, असे नितीन गडकरींनी सांगितले.

हैदराबाद-गोवा कॉरिडोअरची संकल्पना हाती
गोव्यात जेटी विकासाला चांगले सहकार्य मिळाले नाही. जेटीच्या माध्यमातून जलवाहतुकीद्वारे विमानतळ, हॉटेल यांना जोडण्याचा प्रस्ताव होता. भारतमाला प्रकल्पा अंतर्गत महामार्गाचे रुंदीकरण केले जात आहे. हैदराबाद-गोवा कॉरिडोअरची संकल्पना हाती घेण्यात आली आहे. या मार्गासाठी लागणारी जमिनी उपलब्ध करण्यासाठी राज्य सरकारने सहकार्य करावे, अशी सूचना नितीन गडकरींनी केली.

बहुप्रतीक्षित खड्डे दुरुस्ती ऍप अखेर सुरू
यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या खड्डे दुरुस्ती ऍपचा शुभारंभ नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ऍप द्वारे खड्‌ड्यांच्या तक्रारी कशा सादर कराव्यात, याविषयी व्हिडिओच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात आले. नागरिक आपल्या भागातील खड्‌ड्यांचे छायाचित्र मोबाईल फोनवरून टिपून ते ऍपवर अपलोड करू शकतात. त्यानंतर खड्‌ड्यांची दुरुस्ती केली जाईल.