मेरशी पंचायत क्षेत्रातील महामार्गाजवळील खारफुटीच्या झाडांच्या नासधूस प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याची सूचना वन खात्याला करण्यात आली आहे, अशी माहिती वनमंत्री विश्वजीत राणे यांनी काल दिली.
मेरशी पंचायत क्षेत्रात खारफुटीच्या झाडांची कत्तल करून मातीचा भराव घालण्यात आला आहे, अशी तक्रार आहे. या प्रकरणी अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून, उपवनपाल आणि वन विभागाच्या अधिकार्यांना सदर जागेची पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, मातीच्या भरावामुळे खारफुटीच्या पाण्याच्या प्रवाहात अडथळा येत आहे का याची जलस्रोत खात्याच्या अधिकार्यांना सोबत घेऊन पाहणी करण्याची सूचना केली आहे. वृक्ष संवर्धन कायद्याचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे, असेही मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मेरशी पंचायतीने सखल जमिनीत मातीचा भराव आणि बांधकाम प्रकरणी जमीनमालकाला काल नोटीस बजावली. येत्या २८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता या प्रकरणी तपासणी केली जाणार आहे, असे नोटिशीमध्ये म्हटले आहे.