>> मुख्यमंत्र्यांची माहिती; बैठकीत ऍपवर चर्चा
मोप येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गोवा टॅक्सी ऍप आणि टॅक्सी क्यू सिस्टमच्या माध्यमातून टॅक्सी सेवा उपलब्ध केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी टॅक्सी ऍप या विषयावरील बैठकीनंतर काल पत्रकारांशी बोलताना दिली.
गोवा टॅक्सी ऍपला राज्य सरकारची मान्यता असणार आहे. तसेच, जीटीडीसीने टॅक्सी मालकांना टॅक्सी काउंटरसाठी नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. वाहतूक खात्याकडून टॅक्सींच्या भाड्यासाठी दर निश्चित केलेला आहे. तो या ठिकाणी लागू केला जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ऍप आधारित टॅक्सी ही काळाची गरज आहे. टॅक्सीमालक ऍपमध्ये सहभागी झाले, तर त्यांचे काहीच नुकसान होणार नाही. आगामी काळात सर्व टॅक्सी ऍपवर घेतल्या जाणार आहेत. मोप आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गोवा टॅक्सी ऍपच्या माध्यमातून १०० टक्के टॅक्सीला चालना दिली जाणार आहे. सर्व टॅक्सी व्यावसायिकांनी ऍपवर आले पाहिजे. कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. पर्यटन क्षेत्रात पर्यटकांशी कुठल्याही प्रकारचे गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
गोवा टॅक्सी ऍपमध्ये आणखी सुधारणा केली जाणार आहे. त्यानंतर मंत्रिमंडळाची मान्यता घेतली जाणार आहे, असे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी काल बैठकीनंतर बोलताना सांगितले.
टॅक्सी ऍपमध्ये सहभागी व्हावे लागणार
टॅक्सीचालकांसाठी आणखी कल्याणकारी योजना जाहीर करण्यात येणार आहेत. टॅक्सी ऍप हा ग्राहक आणि टॅक्सीचालक फ्रेंडली असणार आहे. मोप विमानतळावरील टॅक्सी काउंटरसाठी नोंदणी करणार्यांना पुढे गोवा टॅक्सी ऍपमध्ये सहभागी व्हावे लागणार आहे, असे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी स्पष्ट केले.