नव्या झुआरी पुलाचे उद्घाटन २९ डिसेंबरला

0
35

>> केंद्रीय महामार्ग व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार उद्घाटन; काही प्रमाणात वाहतूक कोंडी सुटणार

झुआरी नदीवरील नवीन आठपदरी पुलाच्या एका चौपदरी भागाचे उद्घाटन येत्या गुरुवार दि. २९ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता केंद्रीय महामार्ग व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल येथे पत्रकारांशी बोलताना दिली. या नव्या पुलाच्या चौपदरी भागाचे २६ डिसेंबरला उद्घाटन करण्यात येणार असल्याचे काल दुपारीच सरकारकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र काल सायंकाळी लगेचच काही कारणास्तव तारीख पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे या पुलाचे उद्घाटन आणखी काही दिवसांनी लांबणीवर पडले. हा पूल आता २९ डिसेंबरला वाहतुकीसाठी खुला होत असल्याने कुठ्ठाळीत होणारी वाहतूक कोंडी काही प्रमाणात सुटणार आहे.

काल दुपारी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी झुआरी पुलाच्या एका चौपदरी भागाची पाहणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल, सार्वजनिक बांधकाम खात्याचे वरिष्ठ अधिकारी, कंत्राटदार कंपनीचे अधिकारी व पोलीस अधिकारी यांची उपस्थिती होती.

झुआरी नदीवरील केबल स्टे पूल हा भारतातील दुसरा सर्वांत मोठा केबल स्टे पूल आहे. त्यामुळे उद्घाटनानिमित्त मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संध्याकाळी ६ ते रात्री ९ यावेळेत नवीन केबल स्टे पुलावर हा कार्यक्रम होणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र मुख्यमंत्र्यांनी झुआरी पुलाला कुणाचे नाव देणार, या प्रश्‍नाला बगल दिली.

झुआरी नदीवरील नवीन आठपदरी पूल उत्तर आणि दक्षिण गोव्याला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. या पुलाच्या पहिल्या टप्प्यातील चौपदरी एका भागाचे काम पूर्ण झाले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी एक चौपदरी भाग वाहतुकीसाठी खुला करण्यात येत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

झुआरी नदीवरील नवीन पूल हा एक वैशिष्ट्यपूर्ण पूल असून, नागरिकांनी या पुलाला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन मंत्री नीलेश काब्राल यांनी केले. या पुलाला कुणाचे नाव दिले जाईल, याबाबत त्यांना विचारले असता, कोणाचे नाव द्यायचे असल्यास त्यावर चर्चा करू आणि प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठविला जाईल, असे काब्राल म्हणाले.

महत्त्वाच्या ट्राफिक जंक्शन्सवर हाय-टेक ट्राफिक आयलँड स्थापित करण्याच्या प्रस्तावावर विचार केला जात आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाईसाठी स्वयंचलित पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे, असेही मंत्री काब्राल यांनी सांगितले.

गडकरी हेच नव्या झुआरी पुलाचे शिल्पकार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे हा पूल साकारला जात आहे. गडकरी हेच या पुलाचे खरे शिल्पकार आहेत. या महामार्ग प्रकल्पाची एकूण लांबी १३.२ किलोमीटर असून, अंदाजे २५३० कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारला जात आहे. या पुलाचा दुसरा टप्पा २०२३ अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

जुन्या पुलावर १२ टनापेक्षा जास्त
वजनाच्या अवजड वाहनांना प्रवेश बंद
जुन्या झुआरी पुलावर १२ टनापेक्षा जास्त वजनाच्या अवजड वाहनांना जुन्या पुलाच्या आगशी बाजूला उंची-अडथळा उभारून प्रवेश प्रतिबंधित करण्याचे आदेश दिले आहेत. ही वाहतूक व्यवस्था नव्या झुआरी पुलाचा डाव्या बाजूचा चारपदरी मार्ग पूर्ण होईपर्यंत लागू राहील.

नव्या पुलावरून कशी होईल वाहतूक?

  • सध्याचा जुना झुआरी पूल उत्तर गोव्याकडून दक्षिण गोव्याकडे वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला ठेवला जाणार आहे.
  • उत्तर गोव्याकडून दक्षिण गोव्याकडे जाणारी अवजड वाहने नव्या झुआरी पुलावरील चार पैकी एका लेनचा वापर करून मार्गस्थ होतील.
  • नवीन झुआरी पूलउपयोग अवजड वाहनांबरोबरच दक्षिण गोव्याकडून उत्तर गोव्याकडे जाणार्‍या वाहनांसाठी खुला ठेवला जाणार आहे.
  • मडगाव आणि वास्कोकडून पणजीकडे जाणारी सर्व वाहने नवीन झुआरी पुलाच्या तीन लेनचा वापर करतील.
  • १५ दिवस वाहतुकीचा आढावा घेऊन गरज भासल्यास आवश्यक बदल केला जाईल.