चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक; भारत सतर्क

0
12

चीनमध्ये कोरोना संकटाने पुन्हा डोके वर काढले आहे. चीनमधील सरकारी यंत्रणा जरी अनेक गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करत असली, तरी सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले असून, चीनमधील नेमकी परिस्थिती काय आहे याची दाहकता त्यातून दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमीवर देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी काल उच्चस्तरीय बैठक बोलावली होती.

या बैठकीत काही सूचना करण्यात आल्या. तसेच विदेशातून येणार्‍या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. विशेषत: चीनमधून येणार्‍या प्रवाशांची देशातील विमानतळांवर कोरोना चाचणी करण्यास सुरुवात झाली आहे.
जपान, अमेरिका आणि चीनमध्ये कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी खबरदारी घ्यावी, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहे. तसेच नागरिकांना बूस्टर डोस घेण्याचे आवाहनही केले आहे. याशिवाय गर्दीच्या ठिकाणी मास्क लावण्याची सूचनाही केली आहे. केंद्र सरकार दर आठवड्याला कोरोना स्थितीचा आढावा घेणार आहे.

… तर भारत जोडो यात्रा थांबवा
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी राहुल गांधींना पत्र लिहित भारत जोडो यात्रा थांबवण्याचे आवाहन केले आहे. मांडवीय यांनी राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहित भारत जोडो यात्रेत कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. यात्रेदरम्यान नियमांचे पालन करता येत नसेल, तर भारत जोडो यात्रा थांबवावी, असे देखील मांडवीय यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, भारत जोडो यात्रेला मोदी सरकार घाबरल्याचे वक्तव्य अशोक गेहलोत यांनी केले आहे.