>> एनसीआरबीची धक्कादायक आकडेवारी; बनावट दारुमुळे सरासरी दररोज ४ जणांचा मृत्यू
बनावट आणि विषारी दारू प्राशन केल्यामुळे भारतात मागील सहा वर्षांत जवळपास सात हजार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांची सर्वाधिक संख्या मध्य प्रदेश, कर्नाटक, बिहार आणि पंजाब या राज्यांमध्ये आहे. नॅशनल क्राईम रिकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) च्या आकडेवारीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे, २०१६ पासून दारुबंदी असणार्या बिहारमध्ये विषारी दारुमुळे मागील दोन ते तीन दिवसांत चाळीसपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे.
एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, बनावट दारू पिल्यामुळे २०१६ मध्ये १,०५४ जणांचा मृत्यू झाला होता, तर २०१७ मध्ये १,५१०, वर्ष २०१८ मध्ये १,३६५, वर्ष २०१९ मध्ये १,२९६ आणि वर्ष २०२० मध्ये ९४७ जणांचा मृत्यू झाला होता. गेल्यावर्षी म्हणजेच २०२१ मध्ये देशभरात बनावट दारू पिल्यामुळे ७८२ जणांच्या मृत्यू नोंद झाली. गेल्यावर्षी उत्तर प्रदेशमध्ये बनावट दारुमुळे सर्वाधिक १३७ जणांचा मृत्यू झाला. तसेच पंजाबमध्ये १२७ आणि मध्य प्रदेशमध्ये १०८ जणांचा मृत्यू झाला होता एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, २०१६ ते २०२१ पर्यंत सहा वर्षांच्या कालावधीत बनावट अथवा विषारी दारुमुळे भारतात तब्बल ६,९५४ जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच सरासरी देशात दररोज तीन ते चार जणांचा बनावट दारुमुळे मृत्यू झाला आहे.
आकडेवारीनुसार, २०१६ ते २०२१ या दरम्यान बनावट दारुमुळे मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. सहा वर्षांत मध्य प्रदेशमध्ये बनावट दारुमुळे १,३२२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर कर्नाटकमध्ये १,०१३ आणि पंजाबमध्ये ८५२ जणांचा मृत्यू झाला आहे.
कोणत्या राज्यात किती मृत्यू?
एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, गेल्या ६ वर्षांत बनावट दारुमुळे उत्तर प्रदेशमध्ये ४२५, राजस्थानमध्ये ३३०, झारखंडमध्ये ४८७, हिमाचल प्रदेशमध्ये २३४, हरियाणामध्ये ४८९, गुजरातमध्ये ५४, छत्तीसगढमध्ये ५३५, बिहारमध्ये २३, आंध्र प्रदेशमध्ये २९३ आणि पश्चिम बंगालमध्ये २४ जणांचा आणि नवी दिल्लीमध्ये ११६ जणांचा मृत्यू झाला होता.