म्हादईप्रश्‍नी कर्नाटक मंत्र्यांनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

0
14

म्हादई नदीच्या पाण्यासंबंधीचे आपले प्रकल्प पुढे रेटण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून कर्नाटक राज्याचे जलसंसाधन मंत्री गोविंद कारजोल यांनी काल केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची काल नवी दिल्ली येथे भेट घेऊन सदरप्रश्‍नी त्यांच्याशी चर्चा केली. त्याचबरोबर काल नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय जलविकास एजन्सीच्या बैठकीतही त्यांनी सदर प्रश्‍न उपस्थित केला. आपण म्हादईसह राज्याच्या महत्त्वाच्या जलसिंचन प्रकल्पांसाठी केंद्राकडून कर्नाटकला मान्यता मिळावी यासाठी आपण शेखावत यांच्याशी चर्चा केल्याचे कारजोल यांनी स्पष्ट केले.

म्हादई, गोदावरी व कावेरी या नद्यांमधून कर्नाटक राज्याला मिळणार्‍या पाण्यात मोठी घट झालेली आहे, अशी तक्रार आपण केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. वरील नद्यांच्या पात्रांतून पूर्वी कर्नाटक राज्याला २८३ टीएमसी फूट एवढे पाणी मिळत असे. पण त्यात आता मोठी घट झालेली असून आता राज्याला केवळ १६४ टीएमसी फूट एवढेच पाणी मिळत असल्याची तक्रारही शेखावत यांच्याकडे केली असल्याचे कारजोल यांनी यावेळी सांगितले.