कॉंग्रेस नेते व मध्य प्रदेशचे माजी मंत्री राजा पटेरिया यांना अटक करण्यात आली आहे. राजा पटेरिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. राजा यांना काल पहाटे ५.३० वाजता मध्य प्रदेशमधील दमोह येथून अटक करण्यात आली. पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत पटेरिया यांनी हे वादग्रस्त विधान केल्याचा व्हिडीओ सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
‘मोदी निवडणूक पद्धत संपवतील. ते धर्म, जाती व भाषेच्या आधारावर देशाचे विभाजन करतील. दलित, आदिवासी व अल्पसंख्याकांचे भवितव्य धोक्यात आणतील. राज्यघटनेचे संरक्षण करायचे असेल, तर मोदी यांची हत्या करण्यासाठी तयार राहा’, असे वादग्रस्त विधान पटेरिया यांनी केले होते. पटेरिया यांचा हा व्हिडीओ प्रसारित झाल्यानंतर त्यांच्याविरोधात पन्ना जिल्ह्यातील पवई पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती.