जीवन म्हणजे संघर्ष

0
75

(योगसाधना- ५८०, अंतरंगयोग- १६५)

  • डॉ. सीताकांत घाणेकर

आपण अनेकवेळा म्हटले आहे की या सर्व गोष्टी प्रतीकरूपात आहेत. त्यांचा गर्भितार्थ व आध्यात्मिकता समजून आत्मसात करणे आवश्यक आहे. उगाच वरवरचे कोरडे ज्ञान, पोपटपंची नको. आपल्या जीवनात ते उतरवले तर खरेच सर्व मानवतेचा फायदा होईल.

विश्‍वात, समाजात व्यवस्थित राहायचे असेल तर ज्ञान आवश्यक आहे. तेदेखील विविध क्षेत्रांतील, अनेक विषयांचे. सामान्य ज्ञान असले तरी कुठलीही व्यक्ती जगू शकते. पण त्या जगण्यात सुख-आनंद असेलच असे नक्की सांगता येत नाही. मराठीत एक योग्य शब्द अशा जगण्याला आहे- ‘मर्‍या’- म्हणजे मरण नाही म्हणून जगतो तो. किती विरोधाभास आहे इथे! अशा व्यक्तीची दया येते.

आजच्या जगात परिस्थितीच अशी आहे की, बहुतेकजण असेच जगतात. बहुतेक वेळा ही परिस्थिती इतकी भयानक असते की ती कुणालाही बदलता येत नाही म्हणून आपण ती सोसतो, तिच्याबरोबर जुळवून घेतो. खरे म्हणजे जुळवून घ्यावेच लागते. दुसरा उपायच नाही. कारण आपण इतरांना बदलू शकत नाही. आणि नैसर्गिक आपत्तीवर तर आपण नियंत्रण ठेवूच शकत नाही.

इतिहासाचा थोडाफार अभ्यास केला की वरील गोष्ट सहज लक्षात येईल. मोठमोठे राजे-महाराजे, संत-महापुरुष… अगदी विष्णुवतार- वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्धही याला अपवाद नाहीत. एका दृष्टीने हे चांगले झाले. कारण हे ज्ञानी, विद्वान, शूरवीर परिस्थितीला कसे सामोरे गेले ते मार्गदर्शन आम्हा सामान्यांना लाभले. म्हणून त्यांच्या चरित्राचा व्यवस्थित अभ्यास करून शास्त्रशुद्ध ज्ञान मिळवायचे आहे.

सर्व तर्‍हेचे ज्ञान मार्गदर्शक असते. विविध विषयांचे. पण जीवन सुखी-आनंदाने जगून जीवनविकास साधायचा असेल तर आध्यात्मिक ज्ञान अत्यावश्यक आहे. भारतात हे मुबलक उपलब्ध आहे. विविध सद्गुरू व संस्था या क्षेत्रात अतिसुंदर कार्य विश्‍वात सगळीकडेच करत आहेत.

इथे आता आपला विचार चालू आहे तो माऊंट अबूस्थित प्रजापिता ब्रह्मकुमारी या संस्थेचा. आता विषय चालू आहे तो हल्लीच साजरा केलेल्या नवरात्रीच्या निमित्ताने देवीच्या अष्टशक्तींचा व विविध रूपांचा.
आपण अनेकवेळा म्हटले आहे की या सर्व गोष्टी प्रतीकरूपात आहेत. त्यांचा गर्भितार्थ व आध्यात्मिकता समजून आत्मसात करणे आवश्यक आहे. उगाच वरवरचे कोरडे ज्ञान, पोपटपंची नको. आपल्या जीवनात ते उतरवले तर खरेच सर्व मानवतेचा फायदा होईल.
आठवण करण्यासाठी या अष्टशक्तींचे पुनर्उच्चारण करणे गरजेचे आहे, म्हणजे पुढील शक्ती काय आहे हे समजेल. कारण एक शक्ती पुढच्या शक्तीत गुंतलेली आहे.

अष्टशक्ती अशा आहेत-
१. संयम ठेवून माघार घेणे (पार्वतीदेवी), २. समेट करणे (दुर्गादेवी), ३. सहन करणे (जगदम्बादेवी), ४. सामावून घेऊन स्वीकार करणे (संतोषी मॉं), ५. परख करणे (गायत्रीदेवी), ६. निर्णय घेणे (सरस्वतीदेवी), ७. सामना करणे (कालीदेवी), ८. सहयोग देणे (लक्ष्मीदेवी).

आजचा आपला विषय आहे ‘सामना करणे’ म्हणजेच कालीदेवीची शक्ती. जीवनात प्रत्येकाला विविध प्रकारच्या समस्यांचा, संकटांचा सामना करावाच लागतो. स्वतःची शक्ती नसली तरी. संघर्ष हा अटळ आहे म्हणून अनेक शास्त्रकार म्हणतात- ‘जीवन म्हणजे संघर्ष!’
याला उदाहरणे विविध आहेत.
१. लहान मुलालादेखील आईच्या स्तनातील दूध भगवंताने प्रेमाने बनवले, आईने ते वात्स्यल्याने दिले- त्याच्या हक्काचे- पिण्यासाठी थोडाफार संघर्ष करावाच लागतो.
२. योग्य शिक्षणासाठी शाळा-कॉलेजात जाण्याकरिता तर विविध संघर्ष असतात. योग्य संस्था, चांगले सहकारी, ज्ञानी शिक्षक, येण्या-जाण्याची व्यवस्था, परीक्षा वगैरे.
३. पदवीधर झाल्यानंतर योग्य नोकरी, घरदार, वाहन वगैरे.
४. आयुष्यात स्थिर झाल्यावर योग्य पत्नी, मुलेबाळे, संसार वगैरे.
असा हा संघर्ष चालूच राहतो. त्यातच भर म्हणून रोगराई, नैसर्गिक आपत्ती, विविध राष्ट्रांतील छोट्या-मोठ्या लढाया आहेतच.
हे सगळे बाह्य विषय. प्रत्येकाच्या मनबुद्धीतदेखील विविध संघर्ष चालू असतात. याचे कारण म्हणजे आपले षड्‌रिपू- काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर व अहंकार. जन्मतःच आपण हे सर्व आपल्या आत्म्याबरोबर- संचिताप्रमाणे- घेऊनच जन्म घेतो. हे आंतरिक असून महाभयंकर असतात. ते त्या व्यक्तीचा नास करतातच, पण त्याचबरोबर इतरांनादेखील त्रास देतात.
इतिहासात अशा अनेक व्यक्ती आहेत- रावण, कंस, जरासंध, दुर्योधन, दुःशासन, शकुनी वगैरे असे अनेक. आणि हल्ली जन्मलेले विविध राष्ट्रांतील राजकारणी, आतंकवाद घडवून आणणारे, विश्‍वावर दोन महायुद्धे लादणारे वगैरे.
या सर्व समस्यांमुळे प्रत्येक व्यक्ती हतबल होते. अशावेळी त्याला गरज असते ती आत्मशक्तीची. सर्वजण भगवंताकडे आराधना करतात म्हणून नवरात्रीत विविध शक्तींचे प्रतीक म्हणून वेगवेगळ्या देवी आहेत. त्या असुरांचा संहार करतात.

येथे गरज आहे ती महाकालीची. तिच्या प्रतीक रूपात विविध गोष्टी आहेत.
१. देवीच्या गळ्यात मुंडक्यांची माळ आहे. ती म्हणजे हे असुर… त्यांची डोकी दाखवली आहेत. ती त्यांच्या दुष्ट, स्वार्थी, आत्मकेंद्रित मनबुद्धीचे प्रतीक आहेत.
२. असुराचे डोके कापले की तिथून रक्त वाहते. ते जमिनीवर पडले की आणखी असुर आपोआप तयार होतात. मग त्यांचा नाश होणार तरी कसा? खरे म्हणजे हेदेखील प्रतीकरूपात आहे-
हे आंतरिक असुर संपत नाहीत. सर्व षड्‌रिपू वाढतच असतात. उलट इतरांनी प्रतिकार केला तर ते जास्तच आवेशाने वाढतात.
३. देवीकडे विविध शस्त्रे-अस्त्रे असतात. तशीच शक्तिशाली अस्त्रे असुरांकडेदेखील दाखवतात. आजदेखील विविध शस्त्रे आहेतच की. सुरुवातीला दगडाने मारणारा माणूस नंतर विविध शस्त्रे वापरू लागला. चाकू, सुरी, बाण, तलवार, खंजीर, पिस्तूल… (तर्‍हेतर्‍हेची). प्रगती (की अधोगती!) झाली तशी तोफा, दारूगोळा… आणि आता तर विविध तर्‍हेचे भयानक बॉम्ब… केमिकल, हायड्रोजन, ऍटम… लाखो लोकांचा मृत्यू घडवणारे, भयानक किरणांमुळे कर्करोगासारखे रोग देणारे- आणि तेदेखील लढाईनंतर अनेक वर्षे…
महाकाव्यात असणारी ती हीच- ब्रह्मास्त्र, पाशुपतास्त्र, दिव्यास्त्र, पर्जन्यास्त्र… वगैरे. अश्‍वत्थाम्यासारखे आसुरी प्रवृत्तीचे लोक आजही दिसतात.
अभ्यास केल्यानंतर लगेच लक्षात येते की बाहेरच्या शक्तींवर आपण विजय मिळवू शकत नाही, पण आंतरिक शक्तींवर तर नक्की मिळवू शकतो. म्हणून आत्मशक्ती वाढवण्यासाठी, दैवीशक्ती मिळवण्यासाठी आपण नवरात्री साजरी करतो.

ज्या व्यक्तींनी हे ज्ञान मिळवलेले आहे ते स्वतःसाठी जरूर वापरीत असतील, पण इतरांनादेखील देत असतील अशी आशा करूया. तसा विश्‍वास ठेवूया. प्रामाणिकपणे हृदयापासून प्रार्थना करूया. देवदेवता नक्की प्रसन्न होऊन सर्वांना आशीर्वाद देतील. शक्तीदेखील प्रदान करतील.
(संदर्भ ः प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्‍वविद्यालय यांच्या साहित्यावरून)