भूपेंद्र पटेल गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी शपथबद्ध

0
9

>> पंतप्रधानांसह गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची हजेरी

भूपेंद्र पटेल यांनी काल गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची सलग दुसर्‍यांदा शपथ घेतली. ते गुजरातचे १८ वे मुख्यमंत्री ठरले आहेत. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. गांधीनगर येथील नवीन सचिवालयाजवळील हेलिपॅड मैदानावर हा शपथविधी सोहळा झाला.

गुजरात विधासनभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला होता. १८२ पैकी १५६ जागांवर विजय मिळवत भाजपने ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली होती. त्यानंतर भाजप विधिमंडळ गटाच्या बैठकीत मुख्यमंत्रिपदासाठी भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी भाजपचे आमदार कनू देसाई यांनी भूपेंद्र पटेल यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानंतर भाजपच्या बैठकीत गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी एकमताने भूपेंद्र पटेल यांची निवड करण्यात आली.

शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा उपस्थित होते.

यावेळी कनूभाई मोहनलाल देसाई, ऋषिकेश पटेल, राघवजीभाई पटेल, बलवंतसिन्ह राजपूत, कुवांरजी बाबारिया, मुलुभाई बेरा, कुबेरभाई दिंडोर, धनुबेन बाबारिया, हर्ष संघवी, जगदीश विश्वकर्मा, पुरुषोत्तम सोलंकी, खबर मगनभाई, मुकेशभाई पटेल, भिखुसिंह परमार, प्रफुल पानशेरिया, कुंवरजीभाई हलपटी यांच्यासह एकूण २० आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.