>> भाजपचे खासदार सुशील मोदी यांची राज्यसभेत मागणी; केंद्र सरकारच्या भूमिकेकडे लक्ष
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तथा भाजपचे राज्यसभा खासदार सुशील मोदी यांनी २ हजार रुपयांच्या नोटांमुळे काळा पैसा वाढत असल्याचा गंभीर आरोप काल राज्यसभेत केला. तसेच या २ हजार रुपयांच्या नोटा तात्काळ रद्द कराव्यात, अशी मोठी मागणी केली आहे. मोठ्या किमतीच्या चलनी नोटांमुळे काळ्या पैशाचा साठा वाढतो. त्यामुळे २ हजार रुपयांच्या चलनी नोटांवर बंदी घातली गेली पाहिजे, असे सुशील मोदी म्हणाले. भाजपमधूनच आता २ हजार रुपयांच्या नोटेवर आक्षेप घेतल्याने आणि त्या रद्द करण्याची मागणी केल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. यावर आता मोदी सरकार काय भूमिका घेेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
२००० रुपयांच्या नोटाचा वापर काळा पैसा, दहशतवादास आर्थिक पुरवठा, ड्रग्ज तस्करी व साठेबाजीसाठी केला जात आहे. त्यामुळे काळ्या पैशाचा ओघ थांबवायचा असेल, तर २००० रुपयांची नोट तात्काळ बंद करावी लागेल. २००० रुपयांच्या नोटांच्या सर्क्युलेशनमध्ये आता कोणतेही औचित्य नाही, असे राज्यसभेत सार्वजनिक महत्त्वाच्या प्रकरणांवर चर्चा करताना सुशील मोदी म्हणाले.
आपण अमेरिका, चीन, जर्मनी, जपान सारख्या प्रमुख विकसित अर्थव्यवस्थांकडे पाहिले, तर त्यांच्याकडे १०० च्यावर कोणतेही चलन नाही. त्यामुळे केंद्र सरकारने यावर विचार करून २००० रुपयांच्या नोटांवर बंदी घातली पाहिजे; पण त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनाही नोटा बदलण्यासाठी पुरेशी संधी मिळाली पाहिजे, असेही सुशील मोदी म्हणाले.
दुसरीकडे, बिहारमधील सत्ताधारी जदयूने सुशील मोदींची ही मागणी आपल्याच सरकारविरोधात असल्याचे म्हटले आहे. सुशील मोदींनी राज्यसभेनंतर पक्षीय पातळीवरही केंद्राच्या या निर्णयाचा विरोध केला पाहिजे, असे जदयूचे प्रवक्ते अभिषेक कुमार झा म्हणाले.
कॉंग्रेसचे बिहारमधील प्रवक्ते असित नाथ तिवारी यांनीही या प्रकरणी भाजपवर निशाणा साधला. सुशील मोदींच्या या विधानाचे स्वागत केले पाहिजे. जनतेने नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध केला होता. आता त्यांना पुन्हा जनतेच्या दरबारात जायचे असल्यामुळे ते अशी विधाने करत आहेत, असे तिवारी म्हणाले.
आरबीआयकडून २००० च्या नोटांची छपाई बंद
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) २००० रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली आहे. त्यामुळे ही नोट हळूहळू बाजारातून बंद झाली आहे. सुशील मोदींनी हा मुद्दा उपस्थित करत आगामी काळात केंद्र सरकार २००० च्या नोटेवर बंदी घालू शकेल, असे संकेत दिले. उल्लेखनीय बाब म्हणजे सुशील मोदींनी काही दिवसांपूर्वीच संसदेत खासदारांचा केंद्रीय विद्यालयातील कोटा रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानंतर केंद्राने लोकसभा व राज्यसभेतील सर्वच सदस्यांचा हा कोटा रद्द केला होता.