निरामय आरोग्यासाठी

0
22

गोव्यात नुकतीच भरलेली नववी भव्य जागतिक आयुर्वेद परिषद, गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय आयुर्वेदाच्या या महान वारशाला जगभरामध्ये किती महत्त्वाचे स्थान मिळालेले आहे त्याचा प्रत्यय देणारी होती. नरेंद्र मोदी सरकारने स्वतंत्र आयुष मंत्रालय स्थापन करून आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसाराला जी चालना दिली, त्यातूनच एवढ्या मोठ्या प्रमाणात ही स्वीकारार्हता जगभरात निर्माण झालेली आहे हे नाकारता येणार नाही. ऍलोपथीच्या समोर आयुर्वेद म्हणजे ‘किस झाड की पत्ती’ अशा टेचात वावरत आलेल्यांना आयुर्वेदामध्ये मानवी जीवनाच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी किती सर्वांगीण विचार केलेला आहे, त्याची जाण हळूहळू येऊ लागलेली आहे. ब्रिटिशांनी या देशात पाऊल टाकले आणि नव्या आधुनिक शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, तेव्हापासून वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीत विज्ञाननिष्ठ पाश्‍चात्य वैद्यकालाच प्राधान्य दिले हे समजता येण्यासारखे आहे. परंतु स्वातंत्र्यानंतर तरी किमान आपल्या देशी सरकारांनी प्राचीन भारतीय परंपरेमध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत, ज्या युगानुयुगे, पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आहेत, त्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी आणि विज्ञानाच्या कसोटीवर त्या घासून पुसून लखलखीत स्वरूपात जगापुढे ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. दुर्दैवाने तसे काहीही स्वातंत्र्यानंतरच्या सहा दशकांत कधीही झाले नाही. सगळ्या बाबतींत आपण फक्त कधी सोव्हिएतांचे, तर कधी अमेरिकनांचे अनुकरण करीत राहिलो.
वास्तविक, भारतासाठी योग, आयुर्वेद ही केवढी मोठी उपलब्धी होती! पाश्‍चिमात्य जगतातील वाढत्या ताणतणावांनी ग्रस्त झालेली तेथील जनता अशा गोष्टींच्या ज्ञानासाठी आसुसलेली होती, परंतु जुनेपुराणे म्हणजे कालबाह्य अशा पक्क्या धारणेतून या प्राचीन भारतीय वारशाला आपणच बासनात गुंडाळून टाकले आणि पाश्‍चात्यांच्या तालावर नाचण्यात धन्यता मानली. पुराणातली वानगी पुराणात हे जरी खरे असले, तरी परंपरेमध्ये जे चांगले आहे, उदात्त आहे, उपयुक्त आहे ते स्वीकारले जाण्यास काय हरकत होती? चिकित्सक आणि बुद्धिवादी नजरेतूनही हे नीरक्षीरविवेकाने निवडता आले नसते का? परंतु त्या दिशेने विचार करण्याची गरजच कोणाला भासली नाही. सुदैवाने मोदी सरकारच्या कार्यकाळात तरी या गोष्टींना आधुनिक काळाशी सुसंगत अशा स्वरूपात जगापुढे ठेवले जाऊ लागले आहे. भारतीय योग संयुक्त राष्ट्रांच्या माध्यमातून जगापुढे ठेवला गेला आणि आज अवघ्या जगाने आपल्या दिनक्रमामध्ये योग आणि प्राणायाम सामावून घेतलेला पहायला मिळतो आहे. आयुर्वेदाचे हजारो वर्षांपूर्वी ग्रंथित करण्यात आलेले ज्ञान संस्कृत भाषेच्या उपेक्षेबरोबरच नव्या पिढ्यांपासून दूर जात राहिले. त्याला आजच्या आधुनिक काळाच्या संदर्भात अन्य प्रगत वैद्यकीय प्रणालींच्या खांद्याला खांदा लावून उभे करण्याचे काम सध्या मोदी सरकारच्या कार्यकाळात सुरू आहे. त्याची खिल्ली उडवल्याने त्या पारंपरिक ज्ञानाला मिळणारी जागतिक स्वीकारार्हता दुर्लक्षिता येणार नाही. नुकत्याच येऊन गेलेल्या कोरोनाच्या महामारीमध्ये प्रतिबंधक लस जितकी मोलाची होती, तितकेच या काळात व्यापकपणे अनुसरले गेलेले आयुर्वेदिक प्रतिबंधात्मक उपायही अनमोल होते हे नाकारता येणार नाही. ते नसते तर एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा कोरोना महामारीपासून बचाव करणे निव्वळ अशक्य ठरले असते. आयुर्वेद हा दैनंदिन ताणतणावांच्या जीवनामध्ये वरदान होऊन राहिला आहे. माणसाच्या शारीरिक आणि मानसिक शुद्धीचा सखोल विचार करणार्‍या त्यातील चिकित्सा, निसर्गाशी निकटचा संबंध असलेली आणि कोणतेही शारीर दुष्परिणाम न करणारी, जुनाट रोगांवरही गुणकारी ठरणारी त्यातील औषधे, त्यांची स्वस्त आणि सहज उपलब्धी हे सगळे फायदे आज जगभरात अधिकाधिक स्वीकारले जाताना दिसते. परदेशांमध्ये विशेषतः प्रगत राष्ट्रांमध्ये वैद्यकीय उपचार प्रचंड महाग आहेत. त्यामुळे वैद्यकीय उपचारांसाठी भारतासारख्या विकसनशील देशात धाव घेणे तेथील रुग्णांना स्वस्त पडते. त्यामुळे येथे येऊन छोटे मोठे उपचार केले जातात. त्यातूनच वैद्यकीय पर्यटन ही संकल्पना आपल्याकडे रुजत चालली आहे. आता त्या जोडीने आयुर्वेद पर्यटन ही नवी संकल्पना विकसित होते आहे आणि त्यात आतिथ्य आणि आयुर्वेद या दोहोंचा संगम साधता येणार असल्याने हे एक नवे विशाल क्षेत्र भारतीयांना खुले झालेले आहे. निरामय आरोग्यासाठी उद्याचे जग भारताकडे धाव घेऊ लागले तर आश्‍चर्य वाटू नये. आयुर्वेदातील आजची उलाढाल १० अब्ज डॉलरची आहे. सध्याचा विकासदर पाहता येत्या दशकात ती नवे उच्चांक गाठील यात शंका नाही. आधुनिक विज्ञान आणि आयुर्वेदातील पारंपरिक ज्ञान यांची सांगड घालण्याची आज खरी गरज आहे.