आयुष उद्योगाची जगात झपाट्याने वाढ : नरेंद्र मोदी

0
15

>> आयुर्वेद परिषदेचा कांपाल-पणजीत समारोप

>> आयुष इस्पितळासह विविध संस्थांचे आभासी पद्धतीने उद्घाटन

‘आयुष’ उद्योगाची आता झपाट्याने वाढ होऊ लागलेली आहे. आठ वर्षांपूर्वी २० हजार कोटी रू.चा असलेला हा उद्योग आता सुमारे सात पटींनी वाढून १.५ लाख कोटींवर जाऊन पोहोचला आहे. आणि येणार्‍या काळात त्यात आणखी मोठ्या प्रमाणात वाढ अपेक्षित आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगून आयुर्वेदाचा वापर हा केवळ मानव जातीसाठीच नसून तो प्राणी व अन्य जीवांसाठीही करता येतो व केला जायला हवा. आयुर्वेद व निसर्गोपचार पद्धतीचा गोव्याच्या पर्यटनालाही मोठा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. काल रविवारी कांपाल येथे नवव्या आयुर्वेद परिषद व आरोग्य एक्स्पोच्या समारोप सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना मोदी यांनी, या पारंपरिक भारतीय उपचार पद्धतीची, उद्योगाची आता झपाट्याने वाढ व विस्तार होऊ लागलेला आहे. भारताने या संधीचा लाभ उठवायला हवा. येणार्‍या काळात ह्या क्षेत्रातील उद्योग कित्येक पटींनी वाढणार असून त्यामुळे रोजगाराच्या संधीही वाढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आज उद्घाटन करण्यात आलेल्या तीन नव्या राष्ट्रीय प्रकल्पांमुळे या कामाला गती प्राप्त होणार असल्याचा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. ‘वन अर्थ, वन हेल्थ’ हा मंत्रही त्यांनी यावेळी दिला. वन अर्थ वन हेल्थ म्हणजे आरोग्यासाठीची वैश्विक दृष्टी होय, असे मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले. नेहमीप्रमाणेच पंतप्रधान मोदी यांनी, आपल्या भाषणात संस्कृतचा वापर करताना ‘स्वास्थ्यम् परमार्थ साधनम्’ असा मंत्रही दिला. आयुष क्षेत्रात स्टार्टअप्स सुरू करण्यासही मोठा वाव असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच वनौषधीमुळे शेतकर्‍यांनाही या क्षेत्रात मोठा वाव निर्माण होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आयुर्वेदात जास्तीत जास्त संशोधन व्हावे यासाठी सरकारचे प्रयत्न चालू आहेत. भारतात झालेले आयुर्वेदासंबंधीचे शोधनिबंध आता जगभरातील प्रतिष्ठेच्या पत्रिकांमधून प्रसिद्ध होऊ लागले आहेत ही आनंदाची व समाधानाची गोष्ट असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

आम्ही आमच्या मोटारगाडींच्या मशिनांची तसेच अन्य उपकरणांच्या मशिनांची खूप काळजी घेत असतो. पण आपले शरीर हेसुद्धा एक मशीन असून त्याचीही काळजी घ्यायला हवी याकडे आम्ही म्हणावे तसे लक्ष देत नसल्याचे मोदी म्हणाले. यावेळी केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल यांचेही भाषण झाले. विज्ञान भारतीचे अध्यक्ष डॉ. शेखर मंडे यांनी स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल पी. एस्. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, केंद्रीय आयुष राज्यमंत्री डॉ. महेंद्र मुंजापारा तसेच जागतिक आयुर्वेद फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त डॉ. जयप्रकाश नारायण आदी हजर होते. काल मोदी यांचे पणजीत आगमन झाल्यानंतर त्यांनी कांपाल येथे चालू असलेल्या जागतिक आयुर्वेद महासभा व आरोग्य एक्स्पोला भेट देऊन पाहणी केली. व तेथील प्रतिनिधींशी चर्चा केली.

आयुष इस्पितळाचे उद्घाटन
पंतप्रधान मोदी यांनी धारगळ येथील अखिल भारतीय आयुर्वेदिक महाविद्यालय व आयुष इस्पितळ, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ युनानी, गाझियाबाद, उत्तर प्रदेश व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपथी, नरेला, दिल्ली या संस्थांचे आभासी पद्धतीने उद्घाटन केले. ९६० कोटी रु. खर्च करून या संस्था उभारण्यात आल्या आहेत. या संस्थांमधून ४०० विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येणार आहे. तर इस्पितळात ५०० खाटांची सोय आहे.

आयुर्वेदाला ३० देशांची मान्यता
यावेळी बोलताना मोदी यांनी जागतिक आयुर्वेद महासभा व आरोग्य एक्स्पोला हजर असलेल्या जगभरातील प्रतिनिधींचे स्वागत केले. देशभरातील ३० देशांनी पारंपरिक भारतीय उपचार पद्धती असलेल्या आयुर्वेदाला मान्यता दिल्याबद्दल मोदी यांनी यावेळी बोलताना आनंद व्यक्त केला. जगभरात आयुर्वेदला मान्यता मिळवून देण्यासाठी आणखी अथकपणे काम करावे लागणार असल्याचे आवाहन त्यांनी यावेळी हजर असलेल्या प्रतिनिधींना केले.