>> केंद्रिय ग्रामीण विकास मंत्री फगनसिंग कुलस्ते यांचे गौरवोद्गार
>> लोकोत्सवाचा मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात समारोप
आदर्श युवा संघ आणि बलराम शिक्षण संस्थेने शिक्षण आणि आदिवासी कल्याणासाठी खूप योगदान दिलेले असून या ठिकाणी शैक्षणिक केंद्र बनविण्याबरोबरच ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून भरीव सहकार्य देण्याचे आश्वासन केंद्रिय ग्रामीण विकास मंत्री फगनसिंग कुलस्ते यांनी लोकोत्सव समारोपाच्या कार्यक्रमात बोलताना दिले.
या समारंभाच्या व्यासपीठावर ट्रायफोडचे अध्यक्ष रामसिंग राठवा, काटा राजस्थानच्या ऍलन इन्स्टिट्यूटचे संचालक नवीन महेश्वरी, कर्नाटकचे माजी आमदार सुनील हेगडे, काणकोणचे नगराध्यक्ष रमाकांत गावकर, आयोजन समितीचे अध्यक्ष अंकुश गावकर, पैंगीणच्या सरपंच सविता तवडकर, आगोंदच्या सरपंच फातिमा राड्रिग्स, खोतीगावचे सरपंच आनंदू देसाई, पैंगीणचे उपसरपंच सुनील पैगणकर, पंच सतीश पैगीणकर, शिल्पा प्रभुगावकर, काणकोण भाजपा मंडळाचे विशाल देसाई, सचिव दिवाकर पागी, संजीव तिळवे, नगरसेवक हेमंत ना. गावकर, महिला मोर्चाच्या चंदा देसाई, एसटी मोर्चाचे अध्यक्ष दीपक करमरकर, लोलयेचे उपसरपंच चद्रंकांत सुदीर, अजय लोलयेकर, श्रीस्थळच्या सरपंच सेजल गावकर, उपसरपंच शिवा देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
शिक्षण आणि आदिवासी कल्याणाच्या क्षेत्रात माजी प्रधानमंत्री स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून नरेंद्र मोदी यांचे सरकार वाटचाल करीत आहे. तरी देखील ग्रामीण भागातील क्रीडा क्षेत्रात मिळायला पाहिजे तेवढे प्रोत्साहन मिळत नसल्याचे मत फगनसिंग कुलस्ते यांनी व्यक्त केले. आदर्श ग्रामात ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून विविध योजना राबवून ग्रामीण भागात अधिकाधिक सुविधा देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
आदर्श ग्रामात ट्रायफोड मार्फत ट्रायफोट फूड पार्क उभारण्यासाठी काही वेळा कायदा बाजूला ठेवून सुद्धा सहकार्य करण्याची तयारी ट्रायफोडचे अध्यक्ष रामसिंग राठवा यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. आदिवासी समाजाबरोबरच युवकांना प्रोत्साहन देण्याचे काम लोकोत्सवाच्या माध्यमातून होत असल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.
माणुसकी, लोक संस्कृती, ग्रामीण संस्कृती आणि शिक्षण या मुद्यांवर आधारित असलेल्या लोकोत्सवातून सर्वसामान्यांचा स्वाभिमान जागृत करण्याचा आपला प्रयत्न असून उर्वरित ५० महिन्यांत काणकोण मतदारसंघ देशातील एक आदर्श मतदारसंघ बनविण्याचा आपला ध्यास आहे. या लोकोत्सवासाठी मागच्या साडे तीन महिन्यांपासून कार्यकर्ते राबत असून लोकोत्सवाची यश हे आपल्या एकट्याचे काम नसून संपूर्ण टीमचे काम असल्याचे मत सभापती आणि आदर्श युवा संघाचे संस्थापक रमेश तवडकर यांनी यावेळी स्वागत आणि प्रास्ताविकात बोलताना व्यक्त केले. कोटा राजस्थानच्या धर्तीवर आदर्श ग्रामात विशेष प्रकल्प राबविला जाईल. आयआयटी आणि वैद्यकीय क्षेत्रामुळे गावचे नाव सर्वत्र पोचत असल्याचे मत नवीन महेश्वरी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
लोकांची मोठी गर्दी
लोकोत्सवाच्या अखेरच्या समारोपाच्या दिवशी या महोत्सवात अभूतपूर्व असा जनसागर लोटला होता. तिसर्या दिवशीच्या उत्सवाचे समई प्रज्वलित करून उद्घाटन केल्यानंतर फगनसिंग कुलस्ते यांनी आदर्श ग्रामात सर्व स्टॉल्सना भेट दिली. विशेषत: या ठिकाणी भरविण्यात आलेल्या गावठी औषधांच्या स्टॉल्सचे त्यांनी कौतुक केले. तिसर्या दिवशी गोव्याच्या विविध भागाबरोबरच परदेशी पर्यटकांची गर्दी लोटली होती. शालेय स्तरावर विविध स्पर्धा तसेच अन्य राज्यातून आलेल्या लोककला पथकांनी यावेळी कला सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.