>> सावंतवाडीच्या कारिवडे गावातील घटना
मगरीच्या हल्ल्यात कारिवडे येथील महिलेचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार काल सकाळी उघड झाला. लक्ष्मीबाई मेस्त्री (वय ६०) असे त्यांचे नाव असून, गुरुवारी दुपारी त्या आपल्या घराच्या बाजूला असलेल्या ओहोळात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. मात्र उशिरापर्यंत घरी परतल्या नाहीत. त्यांचा सर्वत्र शोध सुरू असतानाच काल सकाळी त्यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत ओहोळात आढळून आला. सदर महिलेचा मृत्यू मगरीच्या हल्ल्यात झाल्याच्या दाव्याला पोलीस व वनविभागाने दुजोरा दिला.
सविस्तर माहितीनुसार, कारिवडे येथे राहणार्या लक्ष्मीबाई मेस्त्री या घराच्या परिसरात असलेल्या ओहोळावर गुरुवारी दुपारी कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. मात्र तेथून त्या परत आल्याच नाहीत. त्या कुठेतरी कामानिमित्त गेल्या असाव्यात, असा संशय आल्याने घरातील व्यक्तींनी शोधाशोध केली; परंतु त्यांचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. त्यानंतर काल सकाळी त्यांची शोधाशोध सुरू असताना घराच्या बाजूला असलेल्या ओहोळात त्यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती मिळताच सावंतवाडीचे पोलीस निरिक्षक फुलचंद मेंगडे आणि वन अधिकारी मदन क्षीरसागर यांनी त्या ठिकाणी धाव घेत पंचनामा केला. लक्ष्मीबाई मेस्त्री यांच्या पश्चात एक मुलगा आणि पती असा परिवार आहे.