लोकोत्सवातून गोव्याच्या ग्रामीण लोकसंस्कृतीचे जतन

0
15

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन; आमोणे येथील आदर्श ग्राममध्ये २२ व्या लोकोत्सवाचे थाटात उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील नवभारताच्या निर्मितीबरोबरच ‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’ ही संकल्पना पूर्ण करण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. यंदाच्या लोकोत्सवात विविध संस्कृतींबरोबरच लोक वेद, खाद्य संस्कृती, वनौषधी आणि ग्रामीण खेळांना प्राधान्य दिले जात आहे ही चांगली बाब आहे. लोकोत्सवाच्या माध्यमातून मागच्या २२ वर्षांपासून सातत्याने गोव्याची ग्रामीण लोकसंस्कृती जतन करण्याचे काम सभापती रमेश तवडकर करीत आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.
आमोणे येथील आदर्श ग्राममध्ये आयोजित केलेल्या २२ व्या लोकोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी सुरुवातीला राज्यपाल डॉ. पी. एस. श्रीधरन पिल्लई आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पारंपरिक समई प्रज्वलित करून लोकोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

उद्घाटन सोहळयानंतर मुख्य शामियानात आयोजित केलेल्या व्यासपीठावर सभापती आणि आदर्श युवा संघाचे संस्थापक रमेश तवडकर, सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल, माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, एसटी मोर्चाच्या केंद्रीय अध्यक्षा तथा बिहार विधानसभेच्या आमदार निकी हेमरन, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, कुंभारजुवेचे राजेश फळदेसाई, पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, वास्कोचे आमदार दाजी साळकर, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, लोकोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष अंकुश गावकर, काणकोणचे नगराध्यक्ष रमाकांत ना. गावकर, लोलयेच्या सरपंच प्रतिजा बांदेकर, श्र्‌रीस्थळच्या सरपंच सेलजा गावकर, पैंगीणच्या सरपंच सविता तवडकर, खोतीगावचे सरपंच आनंदू देसाई, आदर्श युवा संघाचे सचिव अशोक गावकर, काणकोण भाजपचे अध्यक्ष विशाल देसाई उपस्थित होते.

ग्रामीण संस्कृतीशी नाते जोडणार्‍या लोकोत्सवाच्या आयोजनाबद्दल राज्यपाल डॉ. पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी कौतुक केले. आपण आतापर्यंत तीन वेळा काणकोण मतदारसंघात आलेलो आहे. येथील प्राचीन संस्कृती जाणून घेण्याचा आपला प्रयत्न राहिला आहे, असेही राज्यपाल म्हणाले.

काणकोण-मडगाव रस्त्याचे काम लवकरच

काणकोण मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाकडे सरकारचे लक्ष असून, सर्वांची मागणी असलेल्या मडगाव ते काणकोणपर्यंतच्या रस्त्याचे काम लवकरच हातात घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. गोव्याच्या पुढील २५ वर्षांचा विकास आराखडा समोर ठेवून काम केले जात आहे. कुशल कामगार निर्मिती आणि रोजगार निर्मितीकडे लक्ष देण्यात येत आहे. काणकोणबरोबरच सर्व तालुक्यांच्या विकासाकडे आपल्या सरकारचे लक्ष असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.