बेळगावातील हल्ल्यानंतर सीमावाद पेटला

0
16

>> कन्नड रक्षण वेदिके संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या ट्रकांवर दगडफेक; महाराष्ट्र-कर्नाटक सरकार आमनेसामने

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात सीमाप्रश्नावरुन सुरू असलेल्या शाब्दिक वादाने काल हिंसक वळण घेतले. कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात पाऊल ठेवण्यास मज्जाव केला होता. त्यानंतर मंगळवारी कन्नड रक्षण वेदिके संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव-हिरेबागवाडी टोलनाक्याजवळ महाराष्ट्रातील वाहनांना लक्ष्य केले. याठिकाणी महाराष्ट्र पासिंगच्या जवळपास सहा ट्रकांवर दगडफेक आणि शाईफेक करण्यात आली. तसेच कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जोरदार आंदोलनही केले. या प्रकारानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बेळगावसह जत, अक्कलकोट आदी भागांवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दावा केल्यानंतर काल बेळगावजवळ कन्नड संघटनांनी उच्छाद मांडला. कन्नड संघटनांनी महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक केली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी ट्रकवर झेंडे मिरवले. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

सध्या महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांचा सीमा प्रश्न तापला असताना, महाराष्ट्राचे मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील हे काल बेळगाव दौर्‍यावर जाणार होते. बेळगावातील काही संघटनांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमाला हे दोघेही जाणार होते. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी नंतर त्यांनी हा दौरा पुढे ढकलला. आधीच महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद त्यातच महाराष्ट्राचे दोन मंत्री बेळगाव दौर्‍यावर येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर त्याला कन्नड संघटनांचा मोठा विरोध होता. तसेच या दोन्ही मंत्र्यांना पुन्हा महाराष्ट्रात पाठवण्यासाठी बेळगाव सीमेवर काल मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त होता. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी आधीच बेळगाव दौरा रद्द केला, तरीदेखील कन्नड संघटनांनी केलेल्या या कृत्यामुळे आता महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.

कर्नाटकच्या बसेसना काळे फासले
बेळगावमधील दगफेकीचे पडसाद काल नंतर पुण्यात उमटले. पुण्यातील स्वारगेट भागात खासगी पार्किंगमधे उभ्या असलेल्या कर्नाटक सरकारच्या बसेसना शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला; परंतु कार्यकर्ते खूपच आक्रमक झाले होते. कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत यावेळी बसेसना काळा आणि भगवा रंग लावण्यात आला. बसेसवर कन्नड भाषेत लिहिण्यात आलेला मजकूर काळ्या आणि भगव्या रंगाने पुसून टाकण्यात आला.

दोषींवर कठोर कारवाई करू : बोम्मई
या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून तीव्र शब्दात नाराजी आणि निषेध नोंदवला. यावेळी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनांमध्ये लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच महाराष्ट्रातून येणार्‍या वाहनांना संरक्षण दिले जाईल, असे आश्‍वासनही त्यांनी फडणवीसांना दिले.

विषय केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत नेणार : फडणवीस
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दोषींवर कारवाईचे आश्‍वासन दिले आहे. त्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत; पण याचसोबत हा संपूर्ण विषय मी स्वत: देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याही कानावर टाकणार आहे. कारण, आपल्याला विकासाकडे जायचे आहे. अशा प्रकारे राज्याराज्यांमध्ये वाद होऊ लागले, तर ते योग्य नाही, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

२४ तासांत हल्ले थांबवा; अन्यथा… : पवार
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर आता वेगळी भूमिका घेण्याची वेळ आली आहे. या विषयात राज्य सरकारने कठोर भूमिका घेणे गरजेचे होते; मात्र ती भूमिका घेतली जात नाही. आज हल्ले झाले त्यामुळे सीमाभागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येत्या २४ तासात वाहनांवरील हल्ले थांबले नाहीत तर एक वेगळी भूमिका घ्यावी लागेल. त्यानंतर जे होईल त्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री जबाबदार असतील, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.