>> सभापती रमेश तवडकर यांची माहिती; अपात्रता याचिकेवर लवकरच सुनावणी
कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ८ फुटीर आमदारांविरुद्धच्या अपात्रता याचिकेवर लवकरच सुनावणी घेण्यात येणार असून, या आमदारांना त्याबाबत येत्या ८ ते १० दिवसांत नोटिसा बजावण्यात येणार असल्याचे गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी काल पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. काल तवडकर यांनी लोकोत्सवानिमित्त घेतलेल्या पत्रकार परिषदेच्यावेळी पत्रकारांनी त्यांना फुटीरांविरुद्धच्या अपात्रता याचिकेसंबंधी छेडले असता, त्यांनी ही माहिती दिली.
गेल्या नोव्हेंबर महिन्याच्या दुसर्या आठवड्यात मांडण्यात आलेल्या या अपात्रता याचिकेवर सुनावणी घेण्यास विलंब का झाला, असा प्रश्न पत्रकारांनी यावेळी सभापतींना केला असता, ते म्हणाले की या सुनावणीस विलंब झालेला नाही. निदान मला तरी तसे वाटत नाही, असे ते म्हणाले. आता ८ ते १० दिवसांत या आमदारांना नोटिसा बजावण्यात येतील व त्यानंतर लवकरच अपात्रता याचिकेवर सुनावणी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या १४ सप्टेंबरला कॉंग्रेस पक्षाच्या ८ आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यात तत्कालीन विरोधी पक्षनेते मायकल लोबो, आमदार दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा, संकल्प आमोणकर, राजेश फळदेसाई, डिलायला लोबो, केदार नाईक व रुडॉल्फ फर्नांडिस यांचा समावेश होता.
हिवाळी अधिवेशन जानेवारीत
गोवा विधानसभेचे हिवाळी अधिवेशन हे जानेवारी महिन्याच्या पहिल्या अथवा दुसर्या आठवड्यात होणार असल्याची माहिती देखील सभापतींनी यावेळी दिली. हे अधिवेशन फक्त आठ दिवसांचे असेल; परंतु ते नेमके कधी सुरू होईल व किती दिवसांचे असेल, यासंबंधीची अधिकृत माहिती पुढील आठ ते दहा दिवसांच्या आत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.