गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदान काल झाले. गेली तीन दशके त्या राज्याला आपला बालेकिल्ला बनवलेल्या भारतीय जनता पक्षासाठी आणि त्यातही स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी ही विधानसभा निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे हे वेगळे सांगण्याचीही आवश्यकता नाही. पारंपरिक प्रतिस्पर्धी कॉंग्रेसच्या जागा गेल्या चार निवडणुकांत ५१, ५९, ६१, ७७ अशा वाढत गेल्या आणि याउलट भाजपच्या मात्र १२७, ११७, ११५ आणि २०१७ च्या निवडणुकीत तर केवळ ९९ अशा घसरत गेल्या असल्या, तरी भाजपने आपली मतांची टक्केवारी मात्र ४९ टक्क्यांच्या आसपास प्रयत्नपूर्वक सांभाळलेली आहे. यावेळी ती पन्नास टक्क्यांच्या पार करण्याचा आत्मविश्वास भाजपने व्यक्त केला असला, तरी गुजरातमध्ये नव्यानेच पदार्पण करून कॉंग्रेसची जागा घेऊ पाहणारा आम आदमी पक्ष यावेळच्या तिरंगी लढतीचे पारडे कसे फिरवणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे. कॉंग्रेसच्या मतांना खिंडार पाडून आप भाजपाच्या विजयास हातभार लावणार की भाजपालाच आव्हान बनून गुजरात विधानसभेत दिमाखात प्रवेश करणार हे पाहावे लागेल.
कालच्या दुसर्या टप्प्यात मुख्यत्वे उत्तर आणि मध्य गुजरातमध्ये ९४ जागांसाठी मतदान झाले. स्वतः पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीही काल मतदान केले, परंतु या निवडणुकीत मतदारांचा एकूण उत्साह कमी दिसून आला आहे. पहिल्या टप्प्यात तर अपेक्षेपेक्षाही कमी मतदान झाले होते. या अल्प मतदानाचा नेमका अर्थ काय हे निकाल सांगणार आहे.
कॉंग्रेस पक्षाच्या जागा जरी गेल्या चार निवडणुकांत सतत वाढत्या राहिल्या असल्या, तरी माधवसिंह सोळंकींच्या काळी पक्षाने जसा विक्रम प्रस्थापित केला होता, त्या वाटेने जाणे तर दूरची बात, उलट कॉंग्रेस यावेळी गुजरातमध्ये अस्तित्वाच्या लढाईत उतरलेला आहे. पक्षाचे दोन डझन आमदार भाजपाने पळवले. भाजपच्या एकूण उमेदवारांत दहा टक्के उमेदवार हे यावेळी दुसर्या पक्षांतून आलेले आहेत. पटीदारांचे नेते हार्दिक पटेलांपासून ते ठाकूरांचे नेते अल्पेश ठाकूरांपर्यंत सर्व संभाव्य प्रतिस्पर्ध्यांना भाजपने व्यवस्थित आपल्या गळाला लावले, परंतु जिग्नेश मेवानीसारखे दलित नेते कॉंग्रेसच्या बाजूने लढत आहेत. त्यामुळे संघर्ष अटीतटीचा आहे. आम आदमी पक्षाने माध्यमांतून आपली हवा निर्माण केलेली असली, तरी प्रत्यक्ष जमिनीवर तो कितपत प्रभाव पाडू शकेल, दिल्ली व पंजाबची पुनरावृत्ती तो गुजरातेत घडवू शकेल का, हा प्रश्नच आहे. आप गुजरातमध्ये खातेही खोलू शकणार नाही अशी भविष्यवाणी भाजप नेत्यांनी वर्तवलेली आहे.
भाजपासाठी गुजरात विधानसभेची निवडणूक केवळ एका राज्याची निवडणूक राहिलेली नाही. त्यांच्यासाठी तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आजही कायम आहे आणि वाढलेली आहे हे देशाला आणि जगाला दाखवून देण्याचा एक मापदंड आहे. गुजरातमध्ये दिमाखदार यश प्राप्त करता आले, तर तो फार मोठा सोहळा बनवून संपूर्ण जगाला मोदींचा करिष्मा दाखवण्याचे ते साधन बनविले जाईल. येणार्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा देशाची सत्ता काबीज करण्यास मोदी – शहांच्या प्रभावाखालील भाजपा सज्ज आहे हा संदेश देशाला देण्यासाठी गुजरात आणि हिमाचल प्रदेशचा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे. दोन्ही राज्यांची निवडणूक तर मोदींच्या लोकप्रियतेच्या बळावरच लढवली गेली आहे. भाजप ह्या निवडणुका आटोपल्या म्हणून स्वस्थ बसणारा पक्ष नव्हे. निवडणुकीची धामधूम संपताच दिल्लीत पक्षाने आपली मंथन बैठक बोलावलेली आहे. त्यामध्ये आगामी रणनीतीसाठी पक्षाला सुसज्ज करण्याच्या दृष्टीने व्यूहरचना होणार आहे. भाजपचे हे वैशिष्ट्य आहे. हे काटेकोर नियोजनच पक्षाच्या आजवरच्या यशाचे खरे गमक आहे. गुजरातमध्ये मतदारांना जोडून घेण्यासाठी अक्षरशः शेकडो व्हॉटस् ऍप ग्रुप बनवण्यात आले होते. लाखो मतदारांना सोशल मीडियावरून सातत्याने आकृष्ट करण्याचा प्रयत्न गेले वर्षभर चालला होता. पन्नाप्रमुख नेमून घरोघरच्या मतदारांकडून मतदान झाले आहे याची खातरजमा करणे हे तर पक्षाचे नेहमीचे तंत्र आहे. परंतु यावेळी जो मतदार नाराज आहे, तो कोणाच्या पारड्यात मत घालणार, तो आम आदमी पक्षाला साथ देणार की कॉंग्रेससोबत राहणार हे पाहणेही औत्सुक्याचे असेल. भाजप या निवडणूक निकालांचे बारकाईने विश्लेषण करणार आहे. त्यानुसार तो आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती आखील. हिंदू राष्ट्रवाद, जगात सुधारलेली भारताची प्रतिमा, मोदी सरकारच्या यशस्वी योजना वगैरे वगैरेंचे पारडे अधिक जड ठरते की, महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्थेतील मंदी, सामान्य जनतेचा खडतर संघर्ष हे अधिक परिणाम घडवते ते ही निवडणूक सांगणार आहे.