>> दोन नेपाळी संशयितांना अटक
कळंगुटमधील एका हॉटेलमध्ये एका ३७ वर्षीय रशियन पर्यटक महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन नेपाळी संशयित नागरिकांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्यांची शकील अन्सारी ऊर्फ सलमान झिरा जलाहा (२३) व सहिमुद्दीन अन्सारी अब्दुल अली जलाहा (२२) अशी नावे आहेत.
सदर पीडित रशियन महिला गुरूवार दि. १ डिसेंबर रोजी पर्यटनानिमित्त गोव्यात येऊन कळंगुट येथील एका हॉटेलमध्ये वास्तव्याला होती. संशयित दोघेही त्याच हॉटेलात रुम बॉईज म्हणून काम करत होते. ही बलात्काराची घटना सदर महिला आल्यादिवशीच म्हणजे दि. १ डिसेंबर रोजीच घडली. त्यानंतर काल दि. २ डिसेंबर रोजी पीडित महिलेने कळंगुट पोलीस स्थानकावर तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर दोघाही संशयितांना अटक करण्यात आली. दोघांनाही पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणी निरीक्षक दत्तगुरु सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक प्रगती मळीक तपास करीत आहेत.