>> कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे वादग्रस्त विधान
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडून वारंवार वादग्रस्त विधाने करत असून त्यांनी आता महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये असा इशारा दिला आहे. सीमाप्रश्नी नेमलेले महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई हे बेळगाव दौरा करणार होते. परंतु या दौर्याला लक्ष्य करत बोम्मई यांनी वरील इशारा दिला आहे.
बेळगावात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री बोम्मई बोलत होते. सध्या कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सीमाप्रश्नाची परिस्थिती पाहता महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये. याबाबत कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांनाही माहिती दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या घटनेवर महाराष्ट्राचे सरकार कर्नाटकच्या मंत्र्यांनी महाराष्ट्रात पाय ठेवू नये असा फतवा कधी काढणार असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या देशातील नागरीक कुठेही जाऊ शकतो असे सांगत खासदार राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर द्यावे अन्यथा आम्हाला बेळगावला जावे लागेल असा इशारा दिला.
महाराष्ट्र मंत्र्यांचा दौरा लांबणीवर
राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई हे आज शनिवारी बेळगाव दौर्यावर जाणार होते. पण त्यांचा हा दौरा आता ६ डिसेंबरला होणार आहे. या दिवशी ते सीमाभागातील मराठी बांधवांशी संवाद साधणार आहेत. याला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी विरोध केला आहे. महाराष्ट्राचा एकही नेता बेळगावमध्ये जाऊ नये म्हणून कर्नाटक पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सीमाभागातील २१ नाक्यावर दोन हजार पोलीस तळ ठोकून आहेत. ६ डिसेंबरपर्यंत हा बंदोबस्त कायम राहणार आहे. राज्य राखीव दलाच्या तुकड्या येथे तैनात करण्यात आल्या आहेत.