नदाव लॅपिड यांचा अखेर माफीनामा

0
10

>> ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाबद्दलचे वादग्रस्त वक्तव्य प्रकरण

नुकत्याच पार पडलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) ज्युरी हेड नदाव लॅपिड यांनी ‘द काश्मीर फाईल्स’ असे हा प्रपोगंडा व वल्गर चित्रपट असे विधान केल्याने देशातील राजकीय वातावरण तापले. लॅपिड यांच्या वक्तव्याचे काहींनी समर्थन केले, तर काहींना कडाडून विरोध केला. बुधवारपर्यंत लॅपिड हे आपल्या विधानावर ठाम होते; मात्र काल अखेर नदाव लॅपिड यांनी सदर वक्तव्याबाबत माफी मागितली.

२२ नोव्हेंबर रोजी गोव्यात आयोजित इफ्फीच्या समारोप समारंभात लॅपिड यांनी ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटावर भाष्य केले. लॅपिड यांनी ‘द काश्मीर फाईल्स’ हा अश्लील आणि अपप्रचार करणारा चित्रपट असल्याचे वक्तव्य केले होते, त्यानंतर वाद वाढला होता.

या गदारोळानंतर आता लॅपिड यांचा सूर बदलला आहे. देशातील एका राष्ट्रीय पातळीवर खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या प्रकरणी माफी मागितली. मला कुणाचाही अपमान करायचा नव्हता. पीडित किंवा त्यांच्या नातेवाईकांचा अपमान करण्याचा माझा कधीच हेतू नव्हता. मी माफी मागतो, असे लॅपिड म्हणाले.

दरम्यान, या प्रकरणी वाद उफाळल्यानंतर इस्राइलचे राजदूत नाओर गिलोन यांनी याआधी लॅपिड यांची कानउघडणी केली होती. तसेच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लॅपिड यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता. इफ्फीच्या व्यासपीठाचा गैरवापर करण्यात आला असून, एनएफडीसी आणि ईएसजी या गोष्टीची गंभीर दखल घेईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते.

वक्तव्याचा वेगळाच अर्थ लावला
मला कुणाच्याही भावना दुखवयाच्या नव्हत्या. माझा तो उद्देशही नव्हता. मी जे काही बोललो त्याचा वेगळाच अर्थ लावला गेला. आणि त्यामुळे विसंवाद झाला. त्याचा वेगळाच परिणामही दिसून आला. त्यामुळे जर कुणाला वाईट वाटले असेल, तर मी माफी मागतो, अशा शब्दांत नदाव लॅपिड यांनी माफी मागितली.