डिसेंबर अखेरपर्यंत नवा झुआरी पूल वाहतुकीस खुला

0
24

>> एक मार्गिका खुली होणार; पुलाची भारक्षमता चाचणी सुरू; सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांच्याकडून पाहणी

राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नव्या झुआरी पुलाच्या एका बाजूचे काम आता पूर्ण झाले असून, हा पूल वाहतुकीस लवकरात लवकर खुला करण्यासाठी पुलावर भारक्षमतेची चाचणी (लोड टेस्टिंग) काल करण्यात आली. काल पुलाच्या पाहणीनंतर सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी सांगितले की, या आठपदरी केबलस्टेड पुलाचा चारपदरी मार्ग डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी खुला करण्यात येणार आहे, तर उर्वरित चारपदरी मार्ग हा डिसेंबर २०२४ पर्यंत खुला केला जाईल.

नीलेश काब्राल यांनी काल दुपारी या पुलाच्या भारक्षमता चाचणीची पाहणी केली. यावेळी ३२ टनाचा एक ट्रक असे एका रांगेत ४ ट्रक मिळून एकूण ३२ ट्रक या केबल पुलावर बुधवारी दुपारपासून २४ तास ठेवण्यात आले. वाहतुकीसाठी डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार्‍या या पुलाच्या चारपदरी मार्गाची वजन पेलण्याची क्षमता तपासण्यासाठी हे ३२ ट्रक ठेवण्यात आले आहेत. लवकरच हा पूल वाहतुकीस खुला करण्याचा सरकारचा इरादा आहे. या पुलाच्या एकंदर बांधकामावर साडेतीन हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
याप्रसंगी नीलेश काब्राल यांच्यासह सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, वाहतूक पोलीस अधीक्षक बोशेट सिल्वा, वास्को वाहतूक पोलीस निरीक्षक शैलेश नार्वेकर व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. तसेच दिलीप बिल्डकॉनच्या अधिकार्‍यांनी देखील बुधवारी पाहणी केली.

६४० मीटर एवढ्या लांबीचा हा नवा झुआरी पूल देशातील दुसरा सर्वात जास्त लांबीचा पूल देशातील दुसरा सर्वात जास्त लांबीचा पूल असल्याचे काब्राल यांनी सांगितले. दुचाकींसह सर्व वाहनांसाठी हा पूल डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत खुला करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

११ डिसेंबरला उद्घाटन अपेक्षित
झुआरी पूल हा दक्षिण गोव्यातील वाहतुकीसाठी महत्वाचा सेतू मानला जातो. राष्ट्रीय महामार्ग १७ वरील जुना झुआरी पूल कमकुवत आणि धोकादायक बनल्याने सरकारने नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेतला होता. या नव्या झुआरी पुलाचे उद्घाटन ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अपेक्षित आहे. त्यानंतर तो वाहतुकीसाठी खुला केला जाईल.

नवीन झुआरी पुलावरील वाहतूक १५ दिवसांच्या भारक्षमता चाचणीच्या आधारावर खुली करण्यास परवानगी दिली जाईल. हा पूल वाहतुकीस सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतरच तो पूर्ण क्षमतेने खुला केला जाईल.

  • नीलेश काब्राल,
    सार्वजनिक बांधकाममंत्री.