>> गोवा खंडपीठाकडून पोलिसांना कडक कारवाईचे आदेश
नवे वर्ष आणि नाताळ सण जवळ येऊ लागल्याच्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील विविध भागांमध्ये, खासकरून किनारपट्टी भाग व शहरांमध्ये संगीत रजनी व पार्ट्यांचे आयोजन केले जात असून, रात्री उशिरापर्यंत कर्णकर्कश आवाजात संगीत वाजवले जाऊ लागल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने रात्री १० नंतर मोठ्या आवाजात संगीत रजनी चालू राहिल्यास आयोजकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पोलिसांना अशा संगीत रजनी व पार्ट्यांवर कारवाई करण्याची सूचना केली आहे.
किनारपट्टी भागांत हॉटेल्स व रेस्टॉरंटच्या मालकांकडून मोकळ्या जागेत रात्री उशिरापर्यंत कर्णकर्कश आवाजात संगीत रजनी व पार्ट्यांचे आयोजन होत असते. त्यांच्यावर आता न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई होणार आहे. रात्री १० वाजल्यानंतर मोकळ्या ठिकाणी संगीत कार्यक्रमांना परवानगी नसल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले आहे. तसेच फक्त वर्षातील १५ सणांवेळीच रात्री उशिरापर्यंत म्हणजेच १२ वाजेपर्यंत संगीत कार्यक्रमांसाठी परवानगी असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले आहे; मात्र त्यासाठी देखील जिल्हाधिकार्यांकडून परवानगी घेण्याची अट आहे.
राज्यात परवानगी नसतानाही ठिकठिकाणी रात्री १० नंतरही काही मोकळ्या जागेत बेकायदेशीररित्या संगीत कार्यक्रमांचे व पार्ट्यांचे आयोजन होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अशा ध्वनी प्रदूषण करणार्या संगीत रजनींच्या आयोजकांवर गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस प्रशासन व उपजिल्हाधिकार्यांनी कारवाई करावी व त्यासंबंधीचा अहवाल १३ डिसेंबरला पुढील सुनावणीवेळी सादर करण्याचे आदेश खंडपीठाने पोलिसांना दिले आहेत.