>> इफ्फीची सांगता; सिनेतारे-तारकांची हजेरी; वाहिद मोबस्सेरी सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर डॅनिएला नवारो सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
गेले ९ दिवस देश-विदेशातील चित्रपट रसिकांना अनेक दर्जेदार आणि विविधांगी चित्रपटांची मेजवानी देणार्या ५३ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) काल शानदार सोहळ्याने सांगता झाली. ५३ व्या इफ्फीत ‘आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स’ या बेल्जियम, फ्रान्स व कॉस्तारिका या देशांची सहनिर्मिती असलेल्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा सुवर्णमयुर पुरस्कार प्राप्त झाला. ४० लाख रुपये व सुवर्णमयुर असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कॉस्तारिकाचे चित्रपट दिग्दर्शक वेलेटिंना मॉरेल यांनी केले आहे.
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचा रौप्यमयुर पुरस्कार इराणी दिग्दर्शक व लेखक नादेर साईवार यांच्या ‘नो एंड’ या तुर्की चित्रपटाला प्राप्त झाला. १५ लाख रुपये व रौप्यमयुर त्यांना पुरस्काराच्या रुपात मिळाला. याच चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठीचा पुरस्कार वाहिद मोबस्सेरी यांना प्राप्त झाला. त्यांना पुरस्काराच्या रुपात रौप्यमयुर व १० लाख रुपये रक्कम मिळाली. रौप्यमयुर व १० लाख रुपये हा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठीचा पुरस्कार डॅनिएला मारिन नवारो यांना आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स या चित्रपटातील भूमिकेसाठी प्राप्त झाला.
फिलिपिन्सचे फिल्ममेकर लाव्ह डियाझ यांना त्यांच्या व्हेन द वेव्हज आर गॉन या चित्रपटासाठी विशेष ज्युरी पुरस्कार (१५ लाख रुपये व रौप्यमयुर) मिळाला. पदार्पणातील उत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचा पुरस्कार (१० लाख रुपये व रौप्यमयुर) बिहाइंड द हेस्टॅक्स या चित्रपटाचे दिग्दर्शक असामिना प्रोईड्रोव यांना प्राप्त झाला. दिग्दर्शक, लेखक प्रवीण कनद्रेगुला यांना त्यांच्या ‘सिनेमाबंदी’ या चित्रपटासाठी विशेष उल्लेखनीय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. ‘नर्गेसी’ या इराणी चित्रपटाला युनेस्को गांधी मेडल पुरस्कार मिळाला. यावेळी दाक्षिणात्य अभिनेते चिरंजीवी यांचा इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द ईयर पुरस्कार (१० लाख रुपये व शाल) देऊन सन्मान करण्यात आला.
या सोहळ्याला चित्रपट अभिनेते अक्षय कुमार, आयुषमान खुराना, शर्मन जोशी, सत्यजीत चॅटर्जी, राणा दगुबट्टी, अभिनेत्री मानुषी छिल्लर, आशा पारेख, ईशा गुप्ता यांचा शाल व भेटवस्तू देऊन केंद्रीय माहिती-प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
चित्रपट हे फक्त प्रेक्षकांचे मनोरंजन करीत नसून, ते त्यांना शिक्षित करण्याचे कामही करत असतात. यंदाच्या इफ्फीत प्रादेशिक चित्रपटांना चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले.
इफ्फी पुढच्या वेळी यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे आयोजित करता यावा, यासाठी सहभागी व्यक्तींनी सरकारला आवश्यक सूचना कराव्यात, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.
काश्मीर फाईल्सबाबत नाराजी
आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या परीक्षक मंडळाचे चेअरमन नादाव लॅपिड यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात ‘काश्मीर फाईल्स’ या चित्रपाचा जो समावेश करण्यात आला, त्याविषयी काल समारोप सोहळ्याच्या व्यासपीठावर बोलताना नाराजी व्यक्त केली. अशा प्रकाराचे प्रचारासाठी व समाजात दुही माजवणारे चित्रपट आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी करून घेतले जाऊ नयेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.