>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची पत्रकार परिषदेत माहिती; आयुष इस्पितळाचे करणार उद्घाटन
येत्या ८ डिसेंबर ते ११ डिसेंबर दरम्यान होणार्या ९ व्या जागतिक आयुर्वेद कॉंग्रेसच्या समारोप समारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ११ डिसेंबर रोजी गोव्यात येणार असून, त्यांच्या हस्ते धारगळ-पेडणे येथील आयुष इस्पितळाचे उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली.
आल्तिनो-पणजी येथील कर भवनामध्ये आयुर्वेद कॉंग्रेसच्या आयोजन कार्यक्रमाचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. कला अकादमी आणि परिसरात ९ व्या जागतिक आयुर्वेद कॉंग्रेसला ८ डिसेंबरला प्रारंभ होणार असून, ११ डिसेंबर रोजी संध्याकाळी ४.३० वाजता समारोप होणार आहे. या समारोप कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी, दुपारी २ वाजता पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते धारगळ पेडणे येथील आयुष हॉस्पिटल आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद गोवा संकुलाचे उद्घाटन करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
जागतिक आयुर्वेद कॉंग्रेस आणि एक्स्पोमध्ये ४० देशांतील सुमारे ४,५०० ते ५,००० प्रतिनिधी आणि तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. तसेच, चार दिवसीय आयुर्वेदिक कॉंग्रेसला सुमारे एका लाखापेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. गोव्याच्या शेजारील कर्नाटक, महाराष्ट्रात सुध्दा आयुर्वेद कॉंग्रेसबाबत जनजागृती करण्यात आली आहे. त्या भागातील नागरिक या आयुर्वेद कॉंग्रेसला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. चार दिवसीय आयुर्वेद कॉँग्रसमध्ये आयुष-आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, सिद्ध आणि निसर्गोपचारमधील मोफत ओपीडी सुविधांचा लाभ घेण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आयुष इस्पितळात ओपीडी सुरू
धारगळ येथील आयुष इस्पितळामध्ये ओपीडी सुविधा सुरू करण्यात आली असून, रुग्णांवर उपचाराला सुरुवात करण्यात आली आहे. केवळ पेडणे तालुक्यातील नव्हे, तर संपूर्ण गोव्यातील नागरिकांनी आयुष इस्पितळातील उपचारांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
या पत्रकार परिषदेला भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेजा, आयुष मंत्रालयाचे खास सचिव प्रमोद कुमार पाठक, एआयआयएच्या संचालिका प्रा. डॉ. तनुजा नेसरी, पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांची उपस्थिती होती.
मोप विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख अजूनही अनिश्चित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ११ डिसेंबरच्या गोवा दौर्यात मोप आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्टन होणार का, असा प्रश्न विचारला असता, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी त्या प्रश्नावर उत्तर देण्याचे टाळले. मोप विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमाबाबत स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन तारीख जाहीर केली जाई, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.