>> पाकव्याप्त काश्मीर ताब्यांत घेण्यासाठी हालचाली सुरू असल्याची चर्चा
पाकव्याप्त काश्मीर (पीओके) हा भारताचा अविभाज्य भाग असून, तो भाग पुन्हा हालचाली सुरू झाल्याचे संकेत मिळू लागले आहेत. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काही दिवसांपूर्वी पाकव्याप्त काश्मीरबाबत सूचक विधान केले होते. पाकव्याप्त काश्मीरचा लवकरच भारतात समावेश केला जाईल, असे विधान राजनाथ सिंह यांनी केले होते. हे विधान ताजे असतानाच आता भारतीय लष्करातील बड्या अधिकार्याने एक मोठे विधान केले आहे. भारत सरकारने आदेश दिल्यास पाकव्याप्त काश्मीर भारताला जोडण्यासाठी भारतीय सैन्य तयार आहे, असे विधान लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केले आहे.
लेफ्टनंट जनरल पदावरील अधिकार्याने अशा प्रकारचे वक्तव्य केल्याने चर्चांना उधाण आले असून, पाकव्याप्त काश्मीर पुन्हा भारताला जोडण्यासाठी हालचालींना वेग आल्याचे संकेत मिळत आहेत. उपेंद्र द्विवेदी यांनी काल पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.
पीओके भारताला जोडण्याबाबतचा प्रस्ताव संसदेत पाठवला आहे. त्यामुळे यामध्ये काहीही नवीन नाही. हा संसदेतील प्रस्तावाचा एक भाग आहे. आता उरला प्रश्न भारतीय सैन्याचा, तर भारत सरकारने दिलेला कोणताही आदेश अमलात आणण्यासाठी भारतीय सैन्य तयार आहे. जेव्हा याबाबतचा आदेश दिला जाईल, तेव्हा आम्ही पूर्ण तयारीने पुढे जाऊ, असे विधान उपेंद्र द्विवेदी यांनी केले.
दरम्यान, भारतीय वायूदलाने २७ ऑक्टोबरला शौर्यदिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याममध्ये बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पीओके भारतात परत आणण्यासाठी कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत दिले होते. पीओकेमध्ये पाक लष्कराकडून लोकांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होत आहे. त्याचा परिणाम पाकला भोगावाच लागेल. गिलगिट आणि बाल्टिस्तान हे प्रदेश पाककडून भारतामध्ये परत आणल्यानंतरच भारताचे मिशन पूर्ण होणार, असे त्यांनी म्हटले होते.
पाकव्याप्त काश्मीर भारताचा अविभाज्य भाग
जम्मू काश्मीरचा उत्तरेकडील भाग असलेला गिलगिट बाल्टिस्तान हा भाग सध्या पाकिस्तानच्या नियंत्रणाखाली आहे. भारत-पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर हा भाग भारतात सामील झाला होता; पण पाकिस्तानने या भागात घुसखोर आणि पाक लष्कर घुसवले आणि गिलगिट बाल्टिस्तानचा भाग बळकावला. यावेळी पाकिस्तानचे लष्कर श्रीनगरपर्यंत पोहोचले होते; पण भारतीय लष्कराने त्यांना मागे सारले. त्यानंतर संयुक्त राष्ट्राने या ठिकाणी युद्धबंदीची घोषणा केली. त्यामुळे या ठिकाणची परिस्थिती जैसे थे ठेवण्यात आली. हा प्रदेश भारताचा असून, त्यावर पाककडून दावा केला जात आहे.