तीन वर्षांनंतर पहिले विदेशी सागरी पर्यटन जहाज दाखल

0
21

>> १ हजारांहून अधिक विदेशी पर्यटकांचे आगमन; देशी कोर्डेलिया एम्प्रेस जहाजातूनही १ हजार पर्यटक राज्यात उतरले

यंदाच्या हंगामातील पहिले विदेशी सागरी पर्यटन जहाज ‘विकिंग मार्स’ हे १ हजारांहून अधिक पर्यटकांना घेऊन गोव्यात दाखल झाले. मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी गोव्यातील पहिल्या विदेशी पर्यटन जहाजातील पर्यटकांचे स्वागत केले. कोरोना महामारीच्या उद्रेकानंतर गेली तीन वर्षे एकही विदेशी सागरी पर्यटन जहाज गोव्यात दाखल झाले नव्हते. त्यामुळे राज्याच्या पर्यटनाला फटका बसला होता. यंदाच्या २०२२-२३ पर्यटन हंगामातील पहिल्या विदेशी पर्यटक जहाजातून ६५१ पर्यटक आणि ४५२ कर्मचारी राज्यात उतरले आहेत. तसेच कोर्डेलिया हे देशांतर्गत जहाजही सुमारे १ हजार पर्यटकांना घेऊन मुरगाव बंदरात दाखल झाले. त्यामुळे गोव्यातील पर्यटन हंगाम बहरणार असल्याचे चित्र दिसून आले.

यंदाच्या समुद्र पर्यटन हंगामाला २० सप्टेंबरपासून ‘कोर्डेलिया एम्प्रेस’ या देशी जहाजाच्या आगमनाने सुरुवात झाली. यावर्षी एकूण ५१ देशी-विदेशी पर्यटक जहाजे गोव्यातील मुरगाव बंदरात दाखल होणार आहेत. त्यात कार्डेलिया या देशांतर्गत पर्यटक जहाजाच्या ३५, तर विदेशी जहाजांच्या १६ फेर्‍या असतील. एकूण ७ लाख ४५ हजार देशी-विदेशी पर्यटक समुद्री मार्गे राज्यात दाखल होणार आहेत. सागरी पर्यटनाला आरंभ झाल्याने पर्यटन व्यवसायाला उभारी येण्यास सुरुवात झाली आहे.

तीन वर्षानंतर मुरगाव बंदरात विदेशी पर्यटक जहाज दाखल झाल्याने व्यावसायिक सुखावले आहेत. विदेशी जहाजातील पर्यटकांच्या बाबतीत कोविड संबंधीच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून पर्यटकांना गोवा भ्रमंतीसाठी चालना देण्यात आली. सदर जहाजातील प्रवासांचे सर्व सोपस्कार पूर्ण करण्यात आल्यानंतर गोवा भ्रमंतीसाठी पर्यटक बसमधून नेण्यात आले. एकूण २४ पर्यटक बसेसचा ताफा तैनात ठेवण्यात आला होता. तसेच मुरगाव बंदराच्या गेट बाहेर शेकडो पर्यटक टॅक्सी तैनात ठेवण्यात आल्या होत्या. काही पर्यटकांनी टॅक्सीतून गोवा भ्रमंती
केली. त्यानंतर संध्याकाळी सदर जहाजे रवाना झाली. विकींग मार्स हे विदेशी जहाज कोलंबो येथे जायला रवाना झाले.

कोरोना महामारीमुळे २०२० पासून सागरी पर्यटन बंद झाल्याने टॅक्सी, बार रेस्टॉरंट व इतर संबंधित व्यवसायांवर विपरित परीणाम झाला होता. त्यामुळे देशी जहाजांबरोबर विदेशी जहाजांची वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. त्यानंतर २०२१ पासून समुद्री पर्यटन हंगाम सुरू झाल्याने पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. २०२१ साली २७ सप्टेंबर ते डिसेंबर अखेरपर्यंत कोर्डेलिया या देशांतर्गत पर्यटक जहाजाच्या एकूण २० फेर्‍या झाल्या होत्या. यंदाच्या २०२२-२३ सालच्या समुद्री पर्यटन हंगामाला ३० सप्टेंबरपासून पुन्हा एकदा कोर्डेलिया एम्प्रेस जहाजाने प्रारंभ झाला. सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत कोर्डेलियाच्या एकूण दहा फेर्‍या असणार आहेत.

ढोल-ताशांच्या गजरात पर्यटकांचे स्वागत
मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर सदर विदेशी पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी खास उपस्थित होते. तसेच महिलांनी आरती घेऊन ओवाळणी केली. तसेच पर्यटकांच्या स्वागतावेळी ढोल-ताशांचा गजरही करण्यात आला.

२०१९ मध्ये आले होते ८० लाख पर्यटक
कोरोना महामारीपूर्वी २०१९ साली देश-विदेशी मिळून ८० लाख २४ हजार ४०० पर्यटकांनी गोव्याला भेट दिली होती. त्या तुलनेत २०२० साली नोव्हेंबरपर्यंत केवळ २५ लाख ८२ हजार ५२ पर्यटक गोव्यात आले होते. २०२१-२२ साली ४२ देशांतर्गत जहाजांच्या फेर्‍यांतून ८४ हजार पर्यटक राज्यात दाखल झाले होते. कोरोना महामारीनंतर देशी-विदेशी पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे आकडेवारीतून दिसून आले होते.