- – रमेश सावईकर
माणूस जर बंधने झुगारून देऊन स्वैराचार अवलंबित जगू लागला तर त्यातून सुव्यवस्थेला सुरुंग लागेल, अन् दुरवस्था पाहायला मिळेल. मनुष्यगुणांबाबत विचार करताना त्याचा अहंकार, गर्व, उन्मत्तपणा, क्रूरता यांचे प्राबल्य वाढत गेले तर तो स्वैराचारी कृत्येच करण्यात धन्यता मानणार. माणसाचा प्रकृतिधर्म जर बिघडला तर तो माणसासारखा वागणार नाही.
शतकानंतर आज पाहिली
पहिली रम्य पहाट
मेघ वितळले, गगन निवळले
क्षितिजावर नव रंग उसळले…
आपला भारत देश ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाला त्यावेळी अशी काव्यसुमने उत्स्फूर्तपणे बाहेर पडली… ब्रिटिश गुलामगिरीच्या श्रृंखला तुटून पडल्या. आम्ही भारतवासीय स्वतंत्र झालो. त्या रम्य पहाटेनंतर उगवणारा सूर्य नित्यनेमाने नवे तेज फाकीत आपला देश दिव्य तेजाने प्रकाशमान करील अशी आपली अपेक्षा होती. स्वातंत्र्यप्राप्तीचे स्वप्न साकार झाले; आता सुराज्य निर्माण करण्याची आकांक्षा फलद्रूप होईल अशा विश्वासाने राष्ट्रभक्त नेत्यांनी अथक प्रयत्न केले. पण प्रारंभीच्या काही वर्षांनंतर स्वातंत्र्य उपभोगीत असताना आपण देशापेक्षा व्यक्ती मोठी मानून वावरू लागलो.
स्वातंत्र्याच्या मर्यादा ओलांडून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना स्वातंत्र्यानं काय साधलं? संस्कृती व संपत्तीसंपन्न असा आपला देश भविष्यात स्वयंपूर्ण होण्याची शक्यता धूसर बनत चालली आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे देशवासीयांमध्ये माजलेला स्वैराचार! देशाच्या स्वातंत्र्यामुळे प्रत्येक नागरिकाला त्याचे हक्क लाभले. पण त्याचबरोबर कर्तव्ये आणि जबाबदारीही आली. पण यांचा मात्र आम्हाला पूर्ण विसर पडलेला आहे. सर्व हक्क हवेत पण कर्तव्ये नकोत अशी आमची मानसिकता बनली आहे. ती बदलायची असेल तर खरी लोकशाही म्हणजे काय हे समजून घेऊन त्यानुसार कर्तव्याचे पालन झाले पाहिजे.
पण दुर्दैवाने तसे घडताना दिसत नाही. देशात मुक्त स्वातंत्र्याला कसलीच बंधने, निर्बंध, कायदे-कानून यांचे लगाम नाहीत. स्वैराचार मुक्तपणे देशात, समाजात नुसता बोकाळला आहे. दिवसेंदिवस तो वाढतच आहे. याची सुरुवात कुटुंबापासून होते ती तेट देशपातळीपर्यंत. स्पर्धा, हेवेदावे, शह-काटशह यांनी फक्त राजकीय क्षेत्रातच नव्हे तर जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत घुसून प्रभाव पाडला आहे. अशा बाबी घडल्या की सगळीकडे ‘राजकारण’ चालतं असं आपण म्हणतो. ‘राजकारण’ या शब्दाचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. राज्य चालविण्यासाठी जी कारण-व्यवस्था लागते म्हणजेच राज्य-व्यवस्था लागते त्याला राजकारण म्हणतात. ती व्यवस्था समजण्यासाठी ‘राज्यशास्त्र’ (पॉलिटिकल सायन्स) जाणून घेणे, ते अभ्यासणे अत्यंत गरजेचे आहे. राज्यशास्त्रामध्ये लोकशाही पद्धती, लोकप्रतिनिधी, त्यांचे हक्क, अधिकार, कर्तव्ये विस्तृतपणे स्पष्ट करण्यात आली आहेत. राज्य मंत्रिमंडळ, केंद्रीय मंत्रिमंडळ, राज्यपाल, पंतप्रधान, राष्ट्रपती आदी सर्वांचे हक्क, स्वातंत्र्य, जबाबदार्या, कर्तव्ये याविषयीचे कायदे व नियम स्पष्ट करण्यात आले आहेत.
देशाचा कारभार राज्यशास्त्रानुसार चालतो का, की स्वैर-मुक्तपणे अधिकार व हक्कांचा वापर करून चालतो? हा एक चिंतनीय विषय ठरेल. राज्यघटनेनुसार लोकशाहीला अनुसरून देश व जनहिताला प्राधान्य देत सत्ताधार्यांनी राज्य शासन चालविले असते तर सुराज्य निर्माण/प्रस्थापित करता आले असते. पण स्वातंत्र्याची ७५ वर्षे उलटून जाताना देशवासीयांना सुराज्य नव्हे तर ‘स्वैराचारी राज्य’ पाहायला मिळते आहे, हे आपले दुर्दैवच म्हणावे लागेल.
सत्तेवर येणारा पक्ष- मग तो राज्यात असो वा केंद्रात- देशाच्या प्रगती व विकासापेक्षा पक्षप्रसार-प्रभावाला प्राधान्य देऊन जनतेला वेळप्रसंगी वेठीस धरून आपले बस्तान मजबूत करण्याकरिता सर्व शक्ती पणाला लावतो.
लोकशाही मजबूत होण्यासाठी, तिचे संवर्धन होण्यासाठी, कारभारावर नियंत्रण राहण्यासाठी आणि सत्ताधार्यांची मनमानी वृत्ती व कारभार थोपविण्याकरिता सक्षम विरोधी पक्षाची नितांत आवश्यकता आहे. विचारांचे, मतांचे आदान-प्रदान लोकशाहीत महत्त्वाचे असते. तसे न करता एकाधिकारशाहीने राज्य चालवून सुराज्य येणार नाही. ‘रामराज्य’ आणण्याच्या वल्गना हवेत विरून जातील. देशात भ्रष्टाचार, व्यभिचार, अत्याचार, घातपात, गुन्हेगारी, फसवणूक, दहशतवाद आदी बाबींचे प्रमाण असीमित आहे. हे प्रमाण कमी व्हावे म्हणून हवे तसे प्रयत्न होत नाहीत. यास पूर्णपणे शासन-यंत्रणेला, सत्ताधार्यांना जबाबदार धरणे चुकीचे ठरेल.
माणूस आपला जीवनधर्म पाळीत नाही. धर्म म्हणजे तरी काय? धर्म म्हणजे धारणा. धारणा म्हणजे व्यवस्था. सर्वांचे सामाजिक जीवन व्यवस्थित चालावे म्हणून जी व्यवस्था आहे त्यालाच धर्म म्हणतात. प्रत्येक माणसाचा प्रकृतिगुण, धर्म वेगळा. त्यानुसार तो वागणार, आचरण करणार, कर्मे करणार. हे गृहीत धरले तरी, प्रत्येक बाबीत भिन्नता असली तरी, त्यात ‘प्रमाणबद्धता’ अभिप्रेत असते. प्रकृतीचाही एक प्रमाणधर्म आहे; तो धाब्यावर बसवून माणसाने कृत्य केले तर ते गैरत्वाकडे झुकण्याची शक्यता अधिक.
माणसाचे गुणही जबाबदार ठरतात- त्याच्या एकूण जगण्याच्या पद्धतीवर. माणूस जर बंधने झुगारून देऊन स्वैराचार अवलंबित जगू लागला तर त्यातून सुव्यवस्थेला सुरुंग लागेल, अन् दुरवस्था पाहायला मिळेल. मनुष्यगुणांबाबत विचार करताना त्याचा अहंकार, गर्व, उन्मत्तपणा, क्रूरता यांचे प्राबल्य वाढत गेले तर तो स्वैराचारी कृत्येच करण्यात धन्यता मानणार. माणसाचा प्रकृतिधर्म जर बिघडला तर तो माणसासारखा वागणार नाही.
माणूस हा त्याच्या कुटुंबाचा जसा एक घटक आहे, तसा तो गाव, राज्य व देशाचाही एक घटक आहे. जबाबदार नागरिक आहे. तो जबाबदारीने वागण्याची अपेक्षा आपण केव्हा ठेवू शकतो? त्याच्यावर घरापासून बालपणातून तो मोठा होईपर्यंत योग्य संस्कार झाले तरच! ही जबाबदारी घरात- पालकांची, शाळेत- शिक्षकांची आणि सामाजिक जीवनात- समाजसुधारक नेत्यांची. माणूस हा मूलतः संस्कारक्षम आहे. त्याच्यावर संस्कार करणार्यांनी आपली जबाबदारी पूर्णत्वाने निभावली तरच सुसंस्कृत, सुजाण व जबाबदार नागरिक देशाला लाभू शकतील.
जबाबदार नागरिकांच्या बळावर देशात सुराज्य प्रस्थापित करायचे असेल तर भविष्यात तसे नागरिक बनविण्याचे कार्य कुटुंबापासून सुरू व्हायला हवे. कुटुंबात हे घडून येण्यासाठी कुटुंबव्यवस्था ढासळू देता कामा नये. ती जबाबदारी प्रत्येक कुटुंबप्रमुखाची. जबाबदारी काय तर कुटुंबातील सदस्यांना योग्य प्रमाणात स्वातंत्र्य देणे, त्यांचा स्वाभाविक, भावनिकदृष्ट्या विचार करणे, त्याच्या मतांची नोंद घेणे आणि प्रत्येक सदस्याला बरोबर घेऊन कुटुंबाची नौका आपल्या हाती सुकाणू धरून जीवनसागरात यशस्वीपणे पुढे नेणे! हे करण्यात कुटुंबप्रमुख यशस्वी ठरला तर त्यातून जबाबदार, सुसंस्कृत नागरिक घडण्यास मदत होईल.
शाळा-महाविद्यालये-विद्यापीठे चांगले विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्नरत असतात. मुख्यतः गरज आहे ती सामाजिक पोषक वातावरण निर्माण करण्याची. जे ज्येष्ठ नागरिक- मग ते कोणत्याही म्हणजे शिक्षण, साहित्य, व्यापार, विज्ञान, अर्थकारण, राजकारण क्षेत्रांतील असोत- त्यांनी सामाजिक परिस्थितीला योग्य वळणावर नेण्याचा अथक प्रयत्न करायला हवा.
देशात आज लोकजीवनावर, जनताजनार्दनावर सर्वात जास्त कोणाचा प्रभाव असेल तर तो राजकारणी लोकांचा, धुरंधर नेत्यांचा. राजकारण्यांची देशाप्रति नि जनतेप्रति निष्ठा, प्रामाणिकपणा, निःस्वार्थी सेवाभावी वृत्ती यांची नितांत गरज आहे. पण याउलट परिस्थितीचे अवडंबर माजले आहे.
जनता सुखी नाही. समाधानी तर नाहीच नाही. गरजा पूर्ण करण्याएवढी ऐपत नाही. म्हणून नंतर माणूस गैरमार्गाकडे वळतो. त्याकडे विचारपूर्वक बघत नाही. ‘भले काही घडो, आपले ईप्सित कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करीत साध्य करायचे’ यातून मुक्त स्वातंत्र्य उपभोगण्याची, स्वैराचाराने कृत्ये करण्याची प्रवृत्ती बळावली आहे. अजून आपल्या देशात खर्या अर्थाने लोकशाहीची पाळे-मुळे घट्ट रोवली गेलेली नाहीत. ज्या मातीत ती गेली आहेत तीही ठिसूळ आहेत. कारण त्या मातीत देशाभिमान, राष्ट्रभक्ती, निस्सीम निष्ठा, स्वातंत्र्याभिमान तसेच सुराज्य प्रस्थापित करण्याची अनंत ध्येयासक्ती आदींची बी-बियाणी ना पेरली गेली, ना रुजवली गेली, ना जपली गेली. म्हणूनच की काय ‘या मातीचेही बनवीन सोने, सोन्यासंगे पिकवीन दाणे’ हे फक्त स्वप्न ठरले आहे… मृगजळासारखे भासणारे!