खुर्ची टिकवण्यासाठी सरकारची घोषणा

0
18

>> तृणमूल कॉंग्रेस पक्षाची टीका

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सरकारी नोकरभरती कर्मचारी निवड आयोगाद्वारे करण्याची जी घोषणा केली आहे ती आपली खुर्ची सुरक्षित ठेवण्यासाठी अशी टीका काल तृणमूल कॉंग्रेस पक्षाचे माध्यम समन्वयक ट्रॉजन डिमेलो यांनी केले. तसेच भाजप सरकारने रोजगार धोरणावर श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी केली. काल येेथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी कर्मचारी निवड आयोगामध्ये सुरु केलेल्या सुधारणांशी संबंधीत तपशीलवार अधिसूचना जारी करण्याचे मुख्यमंत्र्यांना आवाहन केले.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पुन्हा एकदा जनतेचा विश्‍वासघात केल्याचा आरोप करताना डिमेलो यांनी, २०१७ साली भाजप सरकारने गोमंतकीयांना ५० हजार नोकर्‍यांचे आश्‍वासन दिले होते आणि आता मुख्यमंत्र्यांनी १० हजार नोकर्‍यांचे आश्‍वासन दिले असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्र्यांचा त्यांच्या मंत्र्यांवर अंकुश राहिलेला नाही. आणि तो ठेवता यावा यासाठीच मुख्यमंत्री आता नोकरभरतीसाठी कर्मचारी निवड आयोग लागू करण्याची भाषा करीत असल्याचे डिमेलो म्हणाले.

पारदर्शकतेची गरज : विजय सरदेसाई
कर्मचारी निवड आयोगातर्फे नोकरभरती करण्याचा सरकारचा निर्णय हा चांगला असून आपण या निर्णयाचे स्वागत करतो, असे गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख व फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी काल स्पष्ट केले. मात्र या भरतीत पारदर्शकता येण्यासाठी त्यावर उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी सरदेसाई यांनी केली.