‘दाबोळी’सह नव्या झुआरी पुलाला पर्रीकरंाचे नाव द्या

0
21

मोप येथील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव देण्यात यावे, तर दाबोळी येथील विमानतळाला माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्यात यावे. तसेच झुआरी नदीवर उभारण्यात आलेल्या नव्या पुलालाही मनोहर पर्रीकरांचे नाव द्यावे, असे मत मगोचे नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल व्यक्त केले.

गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब उर्फ दयानंद बांदोडकर हे खरे म्हणजे गोव्याचे भाग्यविधाते होते. त्यांनी गोव्याच्या जडणघडणीत व विकासासासाठी दिलेले योगदान हे फार मोठे आहे. त्यांनी गोव्याच्या विकासाचा पाया रचला. त्यांनी गोवा मुक्तीनंतर मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर राज्यात सर्वत्र प्राथमिक शाळा सुरू करून राज्यातील लोकांना शिक्षित करण्याचे पवित्र कार्य केले. तसेच राज्यात कृषी क्रांती देखील घडवून आणली, असे ढवळीकर म्हणाले.

राज्यातील कला-संस्कृती, साहित्य, भाषा, रंगभूमी अशा सर्वच क्षेत्रांना भाऊसाहेबांनी उत्तेजन देऊन गोव्याचा विकास साधला. त्यांचे हे योगदान लक्षात घेऊन मोप विमानतळाला त्यांचे नाव देणे हेच योग्य ठरणार असल्याचेही ढवळीकर म्हणाले.

दाबोळी विमानतळाला मनोहर पर्रीकर यांचे नाव द्यावे. पर्रीकर हे जेव्हा केंद्रात संरक्षणमंत्रिपदी होते तेव्हा त्यांच्या प्रयत्नांतून दाबोळी विमानतळावर नवी धावपट्टी बांधणे शक्य झाले. पर्रीकरांचेही योगदान मोठे आहे. त्यामुळे दाबोळी विमानतळ व नव्या झुआरी पुलाला त्यांचे नाव द्यावे, अशी सूचना ढवळीकर यांनी काल एका वेबपोर्टलशी बोलताना केली.

मगो पक्षाच्या केंद्रीय समितीने रविवारी एका ठरावाद्वारे मोप विमानतळाला भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी करणारा ठराव संमत केला होता, त्या पार्श्‍वभूमीवर बोलताना ढवळीकरांनी वरील मत व्यक्त केले.मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांची सूचना