>> बहुप्रतीक्षित मुख्यमंत्री देवदर्शन योजना मार्गी; मुख्यमंत्र्यांनी दाखवला रेल्वेला हिरवा झेंडा
बहुप्रतीक्षित मुख्यमंत्री देवदर्शन योजना कालपासून मार्गी लागली. काल मडगाव येथून तिरुपती येथील बालाजीच्या देवदर्शनासाठी ३ हजार भाविकांना घेऊन रेल्वेने प्रयाण केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या रेल्वेला हिरवा कंदील दाखविला. फुलांनी सजविलेल्या रेल्वेला हिरवा बावटा दाखविल्यानंतर सदर रेल्वे पाच वाजता तिरुपतीकडे रवाना झाली.
यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, आमदार दिगंबर कामत व रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.
मडगाव रेल्वे स्टेशनवर या यात्रेचा शुभारंभ झाला. या यात्रेसाठी प्रत्येक यात्रेकरूमागे १०५०० रुपये खर्च असला, तरी एकही पैसा यात्रेकरूंना द्यावा लागणार नाही. या यात्रेचा सर्व खर्च राज्य सरकार करत आहे. ५० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन घडावे म्हणून ही योजना सुरू केली असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी सांगितले.
यात्रेकरूंना प्रवास, जेवण, निवास सर्व मोफत असून, त्यांच्यासोबत डॉक्टर, पोलीस व काळजीवाहू माणसे आहेत. आर्थिक अडचणींमुळे अनेकांना तीर्थयात्रा करणे परवडणारे नसते. त्यामुळे ही योजना सुरू केली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आणखी काही हिंदू भाविकांना घेऊन अन्य एक विशेष रेल्वे येत्या दि. १३ नोव्हेंबर रोजी तिरुपतीकडे प्रयाण करेल. तसेच दि. २० नोव्हेंबर रोजी राज्यातील काही ख्रिस्ती भाविकांना घेऊन अशीच एक विशेष रेल्वे तामिळनाडूतील वेलांकणी तीर्थक्षेत्राकडे प्रयाण करणार आहे. या यात्रेनंतर शिर्डी येथील साईबाबा दर्शनाची यात्रा आखली जाणार आहे.
मुख्यमंत्री देवदर्शन योजनेखाली राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना गोव्याबाहेरील तीर्थयात्रेवर मोफत जाण्याची संधी ही एकदाच मिळेल. ज्यांचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि ज्यांच्याकडे १५ वर्षांचा निवासी दाखला आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी २०२१-२२ या वर्षाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा केली होती.