दहशतवाद्यांवरील बंदीवेळी यूएनएससी अकार्यक्षम

0
7

>> दहशतवादविरोधी समितीच्या विशेष बैठकीत भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांचे खडेबोल

मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्याच्या भीषण आठवणी आजही ताज्या आहेत. या हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांच्या शिक्षेवरुन भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला (यूएनएससी) काल खडेबोल सुनावले. राजकीय मुद्यांमुळे काही प्रकरणांमध्ये जेव्हा दहशतवाद्यांवर बंदी घालण्याची वेळ येते, तेव्हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद अकार्यक्षम असते, असे जयशंकर म्हणाले. मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारांना अजूनही संरक्षण दिले जात असून, त्यांना अद्याप शिक्षा झालेली नाही, अशी नाराजीही जयशंकर यांनी बोलून दाखवली.

मुंबईत आयोजित संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीच्या विशेष बैठकीत ते बोलत होते. मुंबईतील ताज हॉटेलमध्ये सुरू झालेल्या दोन दिवसीय बैठकीच्या पहिल्या दिवशी मुंबईतील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सर्व पंधरा सदस्य देशांच्या राजदूतांनी २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन श्रद्धांजली वाहिली.
दहशतवाद्यांना रोखण्यासाठी कटिबद्ध असल्याचा संदेश आंतरराष्ट्रीय समाजाने दिला पाहिजे, असेही जयशंकर या बैठकीत म्हणाले. २६/११ चा दहशतवादी हल्ला केवळ मुंबईवरच नाही, तर आंतरराष्ट्रीय समाजावर झालेला हल्ला होता. हत्या करण्यापूर्वी दहशतवाद्यांनी विशिष्ट देशांच्या नागरिकांची ओळख पटवली होती. दहशतवादाचा सामना करण्यासाठी बांधिल असलेल्या सुरक्षा परिषदेच्या सदस्यांना हे जाहीर आव्हान होते, तेव्हापासून आम्ही या हल्ल्याच्या सूत्रधारांना शिक्षा करण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, हे काम अजूनही अपूर्णच आहे, असे जयशंकर म्हणाले.
दरम्यान, ‘लष्कर-ए-तोयबा’ या संघटनेच्या दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्यास चीन आडकाठी करत आहे.