>> केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची हरयाणात महत्वपूर्ण घोषणा
एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणा या केंद्रीय तपास संस्थेला अतिरिक्त अधिकार देण्यात आले असून, २०२४ सालापर्यंत प्रत्येक राज्यामध्ये त्याचे कार्यालय असेल, अशी महत्वपूर्ण घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल केली.
हरयाणा राज्यातील सुरजकुंड या ठिकाणी विविध राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. हरयाणातील विविध राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या परिषदेत राज्याचे गृहमंत्री नात्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाग घेतला.
देशभरातील सायबर गुन्हे, नार्कोटिक्स, सीमेपलीकडून होणारे दहशतवादी हल्ले, राष्ट्रविरोधी कारवाया आणि अशाच प्रकारच्या इतर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संपूर्ण देशभरात संयुक्त योजना राबवण्यात येणार आहे. को-ऑपरेशन, को-ऑर्डिनेशन आणि कोलॅबोरेशन या तीन ‘सी’च्या आधारे हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. त्याच माध्यमातून सहकारी संघराज्यवादाची मूल्येही जपण्यात येतील, असेही शहांनी सांगितले.