>> महामंडळाकडून निविदा जारी; शालेय मुलांच्या वाहतुकीसाठी वापर होणार
कदंब प्रवासी वाहतूक महामंडळाने मिनी बसगाड्या भाडेपट्टीवर घेण्यासाठी निविदा जारी केली आहे. कदंब महामंडळाकडून राज्यातील काही विद्यालयांतील मुलांची वाहतूक करण्यासाठी खासगी मिनी बसगाड्या भाडेपट्टीवर घेण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष आमदार उल्हास तुयेकर यांनी दिली.
राज्यातील सुमारे १०० विद्यालयांना शालेय मुलांची वाहतूक करण्यासाठी बसगाड्यांची गरज आहे. कदंब महामंडळाकडे बसगाड्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे महामंडळ त्या विद्यालयांना बसगाड्या पुरवू शकत नाही. त्यासाठी खासगी बसगाड्या भाडेपट्टीवर घेऊन त्या विद्यालयांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. खासगी बसमालकांना किलोमीटरप्रमाणे भाडे दिले जाणार आहे, असे तुयेकर यांनी सांगितले.
कमीत कमी १०० किलोमीटर आणि १०० किलोमीटरवरील अंतरावर वाहतूक करण्यासाठी २३, २७, ३१ आणि ४१ आसनी बसगाड्या कदंबकडून भाडेपट्टीवर घेतल्या जाणार आहेत. बसभाडेपट्टीवरील निविदेचे अर्ज २६ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर २०२२ पर्यत इच्छुकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. भरलेली निविदा १५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ३ वाजेपर्यंत स्वीकारली जाणार असून, त्याच दिवशी संध्याकाळी ३.३० वाजता उघडण्यात येणार आहे, असे कळविण्यात आले आहे.
कदंब महामंडळाकडून प्रवासी मार्गावर चालविण्यासाठी खासगी बसगाड्या भाडेपट्टीवर घेतल्या जात नाहीत, तर विद्यालयातील मुलांच्या वाहतुकीसाठी घेतल्या जात आहेत. कदंब महामंडळाने प्रवासी मार्गावरील खासगी बसगाड्या चालविण्यासाठी घेण्याबाबत चर्चा केली होती. तथापि, खासगी प्रवासी बसगाड्या भाडेपट्टीवर घेण्याबाबत निर्णय झालेला नाही, असे खासगी बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी सांगितले.
सुधारित पास दर नोव्हेंबरपासून लागू
कदंब प्रवासी वाहतूक महामंडळाने प्रवासी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, सामान्य लोकांसाठी सवलतीच्या पास योजनेत सुधारणा केली असून, येत्या १ नोव्हेंबरपासून सुधारित पासचे दर लागू होतील.
साप्ताहिक पाससाठी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलतीची सुधारित टक्केवारी ६० टक्के आहे, तर सामान्य प्रवाशांसाठी २० टक्के आहे. पाक्षिक पाससाठी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलतीची सुधारित टक्केवारी ६५ टक्के आणि सामान्य प्रवाशांसाठी ३० टक्के आहे. मासिक पाससाठी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलतीची सुधारित टक्केवारी ७० टक्के आणि सामान्य प्रवाशांसाठी ४० टक्के आहे. सहामाही आणि वार्षिक पाससाठी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलतीची सुधारित टक्केवारी ७० टक्के आणि सामान्य प्रवाशांसाठी ४० टक्के आहे. कदंबाच्या अनुक्रमे साखळी, म्हापसा, पणजी, फोंडा, वास्को, मडगाव, कुडचडे आणि काणकोण येथील काउंटरवर नागरिक नवीन पास घेऊ शकतात किंवा विद्यमान पासचे नूतनीकरण करू शकतात, असे कळविण्यात आले आहे.