>> ७ ते ११ डिसेंबरपर्यंत आयोजन; ओम बिर्ला यांचीही असणार उपस्थिती
आमोणे-पैंगीण येथील आदर्श ग्राम येथे ७ ते ११ डिसेंबर या दरम्यान होणार्या वार्षिक लोकोत्सवाला यंदा देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या उपस्थित राहणार असल्याची माहिती काणकोणचे आमदार तथा गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
या लोकोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. तसेच यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हेही हजर राहणार आहेत. पाच दिवस चालणार्या या लोकोत्सवात सुमारे २ लाख लोकांची उपस्थिती असेल. गोव्याबरोबरच देशभरातील लोककलाकार व अन्य कलाकार मंडळी या लोकोत्सवाच्या व्यासपीठावरून आपली कला सादर करणार असल्याची माहिती तवडकर यांनी दिली.
गावडोंगरी येथील आदर्श युवा संघ आणि कला-संस्कृती संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या जाणार्या या लोकोत्सवात पारंपरिक लोककला, संस्कृती, विस्मृतीत गेलेले अनेक ग्रामीण क्रीडा प्रकार याबरोबरच वनौषधी, कृषीमालाचे दर्शन लोकांना घडणार आहे, असेही तवडकर यांनी सांगितले.
यंदाच्या लोकोत्सवात ५०० पेक्षा जास्त दालने असतील, त्याद्वारे ग्रामीण जीवन, ग्रामीण खाद्य संस्कृती, ग्रामीण पेहराव, कृषी पीके व अवजारे असे एकूणच ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवणार्या वस्तूंचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. या लोकोत्सवात गोव्याबरोबरच १० ते १५ राज्यांतील दालनांनाही संधी देण्यात येणार आहे, अशी माहिती तवडकर यांनी दिली.
तसेच लोकोत्सवात स्थानिक युवा वर्गासाठी नृत्य व गीतगायन स्पर्धांचेही आयोजन करण्यात येणार आहे.