>> केवळ ८६२ रुग्णांची नोंद, तीन जणांचा मृत्यू
देशात तब्बल १९६ दिवसांनंतर म्हणजेच सुमारे सहा महिन्यांनंतर सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली. दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात ही एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात गेल्या २४ तासांत केवळ ८६२ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झालीे. तसेच तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.
देशात सहा महिन्यांनंतर इतकी कमी रुग्णसंख्या आढळली आहे. याआधी १२ एप्रिल २०२२ रोजी ७९६ कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर हा कोरोना रुग्णांचा आलेख सुमारे तीन लाख रुग्णांपर्यंत पोहोचला होता; मात्र ऐन दिवाळीच्या काळात रुग्णांमध्ये मोठी घट झाल्याने दिलासा मिळाला आहे.
देशात मागील २४ तासांत ८६२ कोरोनाबाधितांची नोंद झाली असून, यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ कोटी ४६ लाख ४४ हजार ९३८ इतकी झाली आहे. त्यापैकी ४ कोटी ४० लाख ९३ हजार ४०९ रुग्ण बरे झाले आहेत. देशातील उपचाराधीन रुग्णांची म्हणजेच सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या २३ हजार १९३ वरून २२ हजार ५४९ वर घसरली आहे.