सिली सोल्स रेस्टॉरंटप्रकरणी स्मृती इराणी यांना दिलासा

0
29

>> आयुक्तांनी फेटाळली याचिका

राज्य अबकारी आयुक्त नारायण गाड यांनी आसगाव बार्देश येथील सिली सोल्स रेस्टॉरंट अँड बारच्या मद्य परवाना नूतनीकरणप्रकरणी ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांनी दाखल केलेली तक्रार काल फेटाळली. या निर्णयामुळे केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री स्मृती इराणी यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, अबकारी आयुक्तांच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान देण्यात येणार आहे, असे ऍड. रॉड्रिगीस यांनी म्हटले आहे.

आसगाव येथील सिली सोल्स कॅफे ऍण्ड रेस्टॉरंट केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्या कुटुंबीयाशी संबंधित असल्याने या रेस्टॉरंटच्या मद्य परवान्याच्या नूतनीकरणाचा विषय राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर बराच गाजला होता. केंद्रीय मंत्री इराणी यांनी कॉंग्रेसच्या नेत्यांनी केलेले आरोप फेटाळून त्यांच्याविरोधात न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. राज्य पातळीवर कॉंग्रेसच्या नेत्यांनी परवान्याचे नूतनीकरण रद्द करण्यासाठी निदर्शने केली होती. मृत व्यक्तीच्या नावे असलेल्या मद्य परवान्याचे नूतनीकरण केल्याप्रकरणी ऍड. रॉड्रिगीस यांनी राज्य अबकारी आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती.

अबकारी आयुक्तांनी सिली सोल्सच्या मद्य परवान्याचे नूतनीकरण कायदेशीर आणि वैध मानले आहे. कारण ते अँथनी डी गामा यांच्या मृत्यूनंतर अँथनी डी’गामा यांच्या पत्नीकडे मद्य परवाना हस्तांतरित करण्यात आला आहे, असे आदेशात म्हटले आहे.

उच्च न्यायालयात जाणार

आसगाव येथील सिली सोल्स कॅफे अँड बारच्या मद्य परवाना नूतनीकरणाच्या विरोधातील तक्रार नाकारण्याच्या अबकारी आयुक्तांच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले जाणार आहे, असे ऍड. रॉड्रिगीस यांनी म्हटले आहे.

अबकारी आयुक्तांना खोटी आणि अपुरी कागदपत्रे सादर करून आणि तथ्यांची चुकीची माहिती देऊन मद्य परवान्याचे नूतनीकरण करण्यात आल्याच्या वस्तुस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे, असा दावा ऍड. रॉड्रिगीस यांनी केला आहे.