अपेक्षेनुरूप मल्लिकार्जुन खर्गेंच्या गळ्यात अखेर कॉंग्रेस अध्यक्षपदाची माळ पडली. नुसतीच पडली नाही, तर घसघशीत मतांनिशी पडली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शशी थरूर यांना साडेनऊ हजारांपैकी जेमतेम हजारभर मते मिळू शकली. २४ वर्षांनी कॉंग्रेसला एकदाचा गांधी घराण्याबाहेरचा नेता मिळाला. पण नेता गांधी घराण्याबाहेरचा आहे; गांधींच्या छायेपलीकडचा आहे काय? खर्गे हे तसे पाहता गांधी घराण्यानेच अप्रत्यक्षपणे पुढे आणलेले उमेदवार होते. त्यामुळे त्यांची कॉंग्रेस अध्यक्षपदी लागलेली वर्णी म्हणजे कॉंग्रेस पक्षावर अजूनही गांधी घराण्याचीच दाट छाया आहे आणि काही नेत्यांनी कितीही बंडाचा आव आणला, पक्षाच्या पुनरुज्जीवनाची भाषा केली, तरीही शेवटी गांधी घराण्याच्या पक्षावरील प्रभावाला पुसून टाकण्याची त्यांची क्षमता मुळीच नाही हेच ह्या निकालातून पुन्हा एकवार सिद्ध झालेले आहे.
बंडखोरी करणार्या काहींना पक्ष सोडावा लागला, तर काही पक्षात बाजूला फेकले गेले आहेत. शशी थरूर यांनी आपण ‘बदलासाठीचे उमेदवार’ असल्याचे भरपूर ढोल बडवून आंतरराष्ट्रीय स्तरावरील आपली प्रतिमा पुन्हा उजळवून घेतली, परंतु प्रत्यक्षात त्यांना मिळालेली मते पाहता कोणत्याही राज्यातील प्रदेश कॉंग्रेस संघटनेचा – अगदी स्वतःच्या केरळमधील प्रदेश कॉंग्रेस समितीचा पाठिंबादेखील ते मिळवू शकलेले नाहीत हे स्पष्ट दिसते. उलट ते ज्या ज्या राज्यांत प्रचारासाठी गेले, तेथे त्यांचे अत्यंत थंडे स्वागत झाले होते. अनेक पदाधिकार्यांनी त्यांना भेटणेदेखील टाळले होते. त्यामुळे खर्गे यांचा विजय निवडणुकीपूर्वीच निश्चित होता. काल राहुल गांधींनी तर निकाल येण्याच्या तासभर आधीच त्यांचे अध्यक्षपद घोषित करून टाकले! थरूर यांची बदलाची भाषा पक्षामध्ये कितपत तरतरी आणते त्याबाबत तशी थोडीभार उत्सुकता होती, परंतु तसे कोणतेही वादळ सोडाच, वावटळही न उठवता थरूर यांना कॉंग्रेसजनांनी जागा दाखवून दिली आहे. ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत, लेखक, मुत्सद्दी जरी असले, तरी मूठभर बुद्धिवादी सोडल्यास भारतासारख्या देशातील राजकारणात अशा लोकांना काडीचेही स्थान नसते. फक्त त्यांच्या उमेदवारीमुळे झाले एवढेच की, खर्गेंची निवड एकमुखाने न होता त्यासाठी निवडणूक झाली ह्याची फक्त इतिहासात नोंद होईल. वर्तमान मूक नव्हते ह्याची जाणीव असावी ह्यासाठी आपण रिंगणात उतरल्याचे थरूर म्हणाले होतेच.
खर्गे यांच्यासारख्या दलित नेत्याची कॉंग्रेससारख्या जुन्याजाणत्या पक्षाच्या अध्यक्षपदी झालेली निवड स्वागतार्ह असली, तरी गांधी घराण्याकडे रिमोट देऊन कळसूत्री बाहुल्यासारखी ते आपली ही कारकीर्द चालवणार आहेत का हा प्रश्न आहे. स्वतंत्र प्रज्ञेने आणि ताठ कण्याने ते खरोखरच कॉंग्रेस पक्षाचा कारभार करू शकतील? आणि त्यांनी समजा तसा तो करायचे ठरवलेच, तर कॉंग्रेसजन त्यांना ते करू देतील? त्याची शक्यता शून्य आहे. खर्गेंचे वय सध्या ८० आहे. उदयपूरच्या चिंतन शिबिरातील सर्व सूचना – शिफारशींची अंमलबजावणी करण्याची ग्वाही त्यांनी दिलेली आहे. पन्नास वर्षांखालील तरुणांना पक्षाची पन्नास टक्के तिकिटे दिली पाहिजेत असा निर्णय उदयपूर शिबिरात झालेला आहे. आपण ते अमलात आणणार असल्याचे खर्गे हिरीरीने सांगत आहेत. म्हणजेच राहुल गांधींच्या नेतृत्वाची छाप पक्षावर राहील ह्याची तजवीज करणे हे त्यांचे काम आहे असे दिसते. खर्गेंची सारी सूत्रे गांधी घराण्याकडेच राहतील, कारण मुळात त्यांची ही निवड झाली आहे ती त्यांच्या सोनियानिष्ठेपोटीच. श्रेष्ठींचे उमेदवार म्हणूनच तर त्यांना एवढी भरघोस मते मिळाली आहेत.
कॉंग्रेस आज अत्यंत वाईट परिस्थितीतून जात आहे. राज्याराज्यांतून भाजप त्यावर सर्वप्रकारचे घाव घालत सुटला आहे. अशावेळी पक्षाची पडझड थांबवून नवचेतना निर्माण करण्याचे काम खरेच खर्गे करू शकतील? आपल्या मतदारसंघात ते लोकप्रिय असतील, सातत्याने निवडूनही येत असतील, परंतु त्यांच्यापाशी ना वक्तृत्व, ना कर्तृत्व. गांधी घराण्याशी असलेली निष्ठा हीच काय ती त्यांची शिदोरी. त्यामुळे अशा मवाळ नेत्याकडून अपेक्षा तरी काय बाळगायची? हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. नंतर गुजरातची निवडणूक असेल. राहुल गांधी भारत जोडायला निघाले आहेत. इथे पक्ष संपण्याची वेळ आलेली आहे. ह्या दोन्ही निवडणुकांमध्ये खर्गे पक्षाला संजीवनी देऊ शकतात का ह्यावर त्यांच्या नेतृत्वाचा कस लागेल. लोकसभा निवडणुका आता दोन वर्षांत होणार आहेत. तोवर गड राखायचा आहे. राहुल गांधींसाठी कोणते ना कोणते पद द्यावेच लागणार आहे. कदाचित कार्याध्यक्षही केले जाईल. खर्गेंचे नेतृत्व केवळ नामधारी राहणार नाही अशी अपेक्षा करूया!