>> टाळे लावल्याने मच्छिमार आक्रमक; गैरकारभाराच्या पार्श्वभूमीवर खात्याने घेतला होता निर्णय
ग खात्याच्या जेटींवर व्यवसाय करण्यासाठी २ लाख रुपये भरा आणि स्वत:ची व्यापारी म्हणून नोंदणी करा; अन्यथा व्यवसाय कायमचा बंद करा, असा इशारा देत खात्याने कुटबण, खारीवाडा व मालिम जेटींच्या प्रवेशद्वाराला काल टाळे ठोकल्याने मच्छिमार संतप्त बनले. त्यांनी तिन्ही जेटींवरील प्रतिनिधींनी तातडीने मत्स्योद्योग खात्याच्या संचालक शर्मिला मोंतेरो यांची भेट घेतली व आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. त्यानंतर सदर निर्णय १० दिवसांसाठी स्थगित ठेवण्याचा निर्णय खात्याने घेतला.
मालिम जेटीवरील काही मच्छिमारांनी दोघा ट्रॉलर मालकांवर बहिष्कार टाकून त्यांची दीड टन मासळी जेटीवर कुजवण्याचे कारस्थान केल्याच्या पार्श्वभूमीवर मत्स्योद्योग खात्याने हा निर्णय घेतला होता.
मत्स्यव्यवसाय विभागाने काल सकाळी खारीवाडा-वास्को येथील मच्छिमारी जेटीला टाळे लावल्याने व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच कारवाईसाठी आलेल्या मत्स्योद्योगच्या अधिकार्यांना धारेवर धरले. अखेर मंत्र्यांच्या आदेशानंतर अधिकार्यांनी दुपारी जेटी उघडली.
काल राज्यातील तीन मासेमारी जेटी सील करताना जारी केलेल्या आदेशात मत्स्योद्योग खात्याने म्हटले होते की, ज्या व्यापार्यांनी खात्याकडे नोंदणी केली आहे, त्यांनाच जेटीच्या आत प्रवेश दिला जाईल. अचानक घेतलेल्या या पवित्र्याने येथील व्यावसायिक भांबावून गेले. सकाळी ८.३० च्या सुमारास जेटीच्या मुख्य दरवाजावर पोलीस तैनात करण्यात आले. त्यामुळे सकाळी जेटीवरून मासे घेऊन जाण्यासाठी आलेली वाहने आत मध्येच अडकून राहिली. तसेच मासळी नेण्यासाठी आलेली वाहने बाहेरच अडवून ठेवण्यात आल्याने व्यावसायिकांची तारांबळ उडाली. कुटबण, मालिम आणि खारीवाडा जेटीवर जे व्यवसाय करतात, त्यांच्याकडे परवाना नाही, त्यांची थकबाकी आहे, हे कारण पुढे करून काल या तिन्ही जेटी सील केल्या.
मालिम जेटीवरही वातावरण तंग
येथील मालीम जेटीच्या प्रवेशद्वाराला काल अचानक टाळे लावल्यामुळे तेथील वातावरण तणावपूर्ण झाले. अचानक प्रवेशद्वाराला कुलूप लावल्यामुळे बोटमालकांची वाहने आतमध्ये अडकून पडली होती. दोन दिवसांपूर्वी मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी मालिम जेटीला भेट दिली असता, काही बोटमालक विनापरवाना व्यवसाय करीत असल्याचे त्यांना आढळून आले होते. त्यानंतर काल ही कारवाई करण्यात आली. प्रवेशद्वार बंद झाल्याने व्यवसायावर काही प्रमाणात परिणाम झाला.
अचानक मच्छिमारी जेटी सील करणे एकदम चुकीचे असून, हे कृत्य सरकारला शोभत नाही. खारीवाडा जेटी ही मासळी व्यावसायिकांसाठी तात्पुरती असून, आम्ही राज्य सरकारकडे कायमस्वरुपी मच्छिमार जेटी बांधण्याची मागणी करीत आलेलो आहोत; पण सरकारने अजूनही त्याबाबत गांभीर्याने विचार केलेला नाही.
- जुझे फिलिप डिसोझा, अध्यक्ष, मच्छिमारी बोटमालक संघटना.