>> १ जानेवारीपासून अंमलबजावणी
गोव्यात सर्वाधिक विदेशी पर्यटकांना घेऊन येणार्या ओमान एअरलाईन्सने ३१ डिसेंबरनंतर दाबोळी विमानतळाचा निरोप घेत १ जानेवारी २०२३ पासून आपली सर्व विमाने मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.
ओमान एअरलाईन्सने यासंबंधीची सर्व माहिती आपल्या ग्राहकांना एका संदेशाद्वारे दिली आहे. दाबोळी विमानतळ प्राधिकरणालाही ओमान एअरलाईन्सने याची कल्पना दिली आहे.
दाबोळी विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानांची सद्दी संपण्याची ही नांदी असल्याचे बोलले जात असून, फक्त देशी प्रवाशांना घेऊन येणारी विमानेच आता दाबोळीवर उतरणार आहेत. व्हिसा समस्येमुळे चालू हंगामात या विमानतळावर चार्टर विमानेही विदेशी पर्यटकांना घेऊन येऊ शकलेली नाहीत. १२ ऑक्टोबरपासून ही विमाने येणार होती; मात्र सदर विमान कंपन्यांनी आपले बुकिंग रद्द केले आहे.